चित्रकलेद्वारे युवा टेबल टेनिसपटू अद्वैतचा कोरोनाशी मुकाबला किशोर पेटकर

Dainik Gomantak
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

``कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी मी चित्रकलेद्वारे आधार घेतला. अल्लाउद्दीनच्या चिरागचा पुन्हा आणले. जादुई जिनीचा वापर करून जगाला कोरोनामुक्त करण्याच्या कल्पनाविश्वात रमलो.``

- अद्वैत मुद्रस,

किशोर पेटकर

पणजी गोव्याचा युवा गुणवान टेबल टेनिसपटू अद्वैत मुद्रस याला कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे घरातच बंदिस्त व्हावे लागले. त्यामुळे तो सुरवातीस कंटाळला, पण खचला नाही. या महामारीचे भय घालवण्यासाठी आणि मुकाबला करण्यासाठी त्याने चित्रकलेचा ध्यास घेतला, त्याद्वारे कल्पनाविश्वात रमला.

मुष्टिफंड विद्यालयात शिकणाऱ्या १३ वर्षीय अद्वैतचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे. सदोदित चैतन्यदायी, उत्साहाचा झरा असलेला अद्वैत राज्यस्तरीय टेबल टेनिसमधील कॅडेट गटातील अव्वल मानांकित खेळाडू आहे. अभ्यास आणि खेळाबरोबरच कविता व निबंध लेखन, वक्तृत्व, चित्रकला, छायाचित्रकला, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातही त्याची यशस्वी मुशाफिरी असते. `लिटल वंडर` या टोपणनावानेही तो ओळखला जातो. २०१९-२० सालासाठी तो मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्य गोमंत बाल भूषण पुरस्काराने सन्मानित झालेला आहे.

जीवनात गरुडाप्रमाणे अथांग आकाशात उंच भरारी घेण्याचे ध्येय बाळगलेल्या अद्वैतचे लॉकडाऊनमुळे पंख छाटल्यागत स्थिती झाली, मात्र सुरवातीस भांवावल्यानंतर स्वतःला सावरण्यात यश मिळविले. तो म्हणाला, ``कोरोना महामारीच्या प्रादुर्भावापूर्वी मी माझ्या दैनंदिनी वेळापत्रकात व्यस्त होतो आणि संपूर्ण दिवस घरी विश्रांती घेण्याची पाळी येईल याची कल्पनाही केली नव्हती. लॉकडाऊनचे पहिले सात दिवस खूपच कठीण होते. वाटू लागले, की मी संयम गमावत आहे आणि त्यामुळे कंटाळा येऊ लागला.``

नियमितपणे पणजीतील डॉन बॉस्को ओरेटरी सराव करणाऱ्या या गुणवान खेळाडूला बंदिवास सोसवेना, मात्र त्यातून त्याने मार्ग काढला. ``मी माझे छंद जोपासण्याचे ठरविले. माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत असलेल्या आसावरी कुलकर्णी यांच्याकडून वर्षभरापूर्वी फोटोग्राफी शिकलो होतो, ही कला माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली. ताजातवाना होण्यासाठी माझे हात हार्मोनियमवर गेले, ज्याद्वारे मी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम होऊ शकलो. वयाच्या आठव्या वर्षापासून मी दिलीप गडेकर यांच्याकडे, तसेच कला अकादमीत हार्मोनियम वादनाचे धडे गिरवत आहे. चित्रकलेचा वापर मी माझे कल्पनाविश्व कागदावर उतरविण्यासाठी करतो,`` असे अद्वैतने लॉकडाऊन कालावधीविषयी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानसंबंधित क्षेत्रात कारकीर्द करण्याचे त्याचे ध्येय आहे. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी यात तो पारंगत आहे. त्याचे स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल आहे आणि त्याद्वारे त्याच्या कलाविष्काराचा अनुभव घेता येतो.

 

``कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी मी चित्रकलेद्वारे आधार घेतला. अल्लाउद्दीनच्या चिरागचा पुन्हा आणले. जादुई जिनीचा वापर करून जगाला कोरोनामुक्त करण्याच्या कल्पनाविश्वात रमलो.``

- अद्वैत मुद्रस,

युवा टेबल टेनिसपटू

 अद्वैतची टेबल टेनिसमधील वाटचाल

- गोव्यात कॅडेट गटातील अव्वल मानांकित खेळाडू

- राज्यस्तरीय सबज्युनियर मानांकनात पाचवा, तर ज्युनियर गटात सहावा

- अखिल गोवा मानांकन स्पर्धेत स्पृहणीय कामगिरीचा आलेख

- डिसेंबर २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व

संबंधित बातम्या