गोव्याचे दुध आजपासून तापले .

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

  महानंद' लीटरमागे दोन रुपयांनी वाढले, गोवा डेअरीचे दुधही महागणार 

राज्य सहकारी दूध उत्पादक संघातर्फे काढण्‍यात आलेले परिपत्रक

उद्यापासून गोवा डेअरीचे दूध घाऊक ५४ रु., तर किरकोळ ५७ रु. प्रति लिटर असे वाढणार असल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोली : दैनंदिन वापरातील आणि आहारातील मुख्य घटक असलेले दूध दिवसेंदिवस तापत आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या महानंद दुधाच्या प्रति लिटरमागे आजपासून दोन रुपयांनी वाढ झाली असतानाच, आता उद्यापासून गोवा डेअरीच्या दूध दरातही वाढ होणार आहे.

तसे परिपत्रकही राज्य सहकारी दूध उत्पादक संघाने संबंधितांना पाठवले आहे. वाढत्या महागाईत जीवनावश्यक दूध दरात वाढ होत असल्याने ग्राहकांतही नाराजी पसरली आहे. दुसऱ्या बाजूने गोवा डेअरीच्या दूध दरात वाढ होत असली, तरी दूध ऊत्पादक मात्र आर्थिक अडचणीत आहेत, असे साळ येथील भूमिका दूध उत्पादक संस्थेचे आदिनाथ परब यांनी म्हटले आहे.

महानंद दूध वाढले
महानंद दुधाचा घाऊक दर प्रति लिटर ४८ रु., तर किरकोळ दर ५० रु. असा नवीन दर आहे. गणेश चतुर्थीनंतर 'महानंद'च्या दरात तीनवेळा प्रत्येकी वेळी २ रु. मिळून आतापर्यंत लिटरमागे 6६ रुपयांनी वाढ झाली आहे. महानंद पाठोपाठ ‘अमूल’ दुधाच्या दरातही वाढ होणार असल्याची माहितीही मिळाली आहे. अमूल दूध सध्या ४४ रु. प्रतिलिटर असा किरकोळ दर आहे.

महाराष्ट्रात पुराचा फटका
यंदा कोल्हापूरात पूर आल्याने, त्याचा फटका तेथील दूध उत्पादन व्यवसायाला बसला आहे. त्यामुळेच दूध दरात वाढ होत असावी, अशी शक्यता डिचोलीतील एक दूध वितरक भगवान हरमलकर यांनी व्यक्त केली आहे. डिचोली तालुक्यात गोवा डेअरीबरोबरच महाराष्ट्रातून महानंद, अमूल तसेच कर्नाटक राज्यातून नंदिनी आणि आरोग्य मिळून जवळपास ६ हजार लिटर दुधाची नियमितपणे आवक होत असते. या तिन्ही डेअरीच्या दुधाला मागणी असली, सर्वांत जास्‍त महानंद डेअरीच्या दुधाला मागणी आहे. डिचोलीत दरदिवशी ३ हजार लिटर महानंद दुधाचे वितरण होत असते, अशी माहिती भगवान हरमलकर यांनी दिली.

 

 

 

 

संबंधित बातम्या