शेतमालाला सुधारीत हमी भाव ३-४ दिवसात ः उपमुख्यमंत्री

Dainik Gomantak
बुधवार, 15 एप्रिल 2020

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ६ हजार रुपये दोन दोन हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये त्याच्या खात्यातकेंद्र सरकारतर्फे जमा केले जातात. या योजनेसाठी गोव्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी ८४०० शेतकरी पात्र आहेत.

पणजी, 
येत्या ३-४ दिवसात काजू उत्पादकांना दिलासा देणारी आधारभूत किंमत जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी दिली. काजू बियाना सध्या १०० रुपये प्रति किलो, अळसांद्याला ७० रुपये प्रती किलो व नारळाला १० रुपये प्रती नग आधारभूत किंमत गेली ४ ते ५ वर्षांपासून  दिली जात आहे. या किमतींचा फेर विचार कारण्यासंदर्भात चर्चा खात्याच्या बैठकीत करण्यात आली असे त्यांनी सांगितले.
कोविड १९ च्या टाळेबंदीच्या काळातही शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे सांगून ते म्हणाले, कृषी खात्याचे संचालक नेव्हिल अल्फान्सो, उपसंचालक चिंतामणी पिरणी व शिवानंद वागळे, फलोत्पादन महामंडळाचे कार्यकारी संचालक संदीप फळदेसाई, कृषी अधिकारी सत्यवान देसाई व दत्तु उर्फ संतोष देसाई यांची बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले आहे, की या कठीण काळात शेतकरी हाच खरा समाजाचा आधार आहे हे नव्याने समोर आले आहे. शेती आणि शेतकरी खंबीर राहिले तर आपले राज्य या कठीण या कठीण परिस्थितीवर मात करू शकेल आणि या साठी कृषिविभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला सर्वतोपरी सहकार्य करावे.
कोविड १९ मुळे घातलेल्या टाळेबंदीच्या काळात गोव्यात प्रती दिन सरासरी ३५० टन भाजीपाला फलोत्पादन महामंडळातर्फे  शेजारच्या राज्यातून आणला. गोव्याला भाजीपाल्यासाठी कमीत कमी इतर राज्यावर अवलंबून राहावे यासाठी, दोन पिकांमध्ये अजून एक पीक घेता यावे यासाठी योजना आखण्याचे निर्देश त्यांनी ह्या बैठकीत शेतकी खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. यामुळे इतर शेतकी उत्पादनातही वाढ होईल, या गोष्टी कडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. फलोत्पादन महामंडळाचे गाळे बस स्टॅण्ड - मार्केट कॉम्प्लेक्स सारख्या महत्वाच्या ठिकाणी व्हावेत व या संदर्भात तपशीलवार चर्चा या वेळी करण्यात अली.
प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ६ हजार रुपये दोन दोन हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये त्याच्या खात्यातकेंद्र सरकारतर्फे जमा केले जातात. या योजनेसाठी गोव्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी ८४०० शेतकरी पात्र आहेत. आत्तापर्यंत अशा प्रकारचे उपक्रम दोन वेळा क्षेत्रीय कृषी अधिकारी कार्यालयातून राबवून बऱ्यापैकी नावनोंदणी करण्यात अाली होती.  राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी परत एकदा हा उपक्रम
राबवण्यात येणार असून उर्वरित शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. तसेच पी एम किसान पेन्शन योजनेची देखील यावेळी नावनोंदणी केली जाणार आहे. त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे.
सध्या खरीप पिकाची कापणी चालू असून मुबलक प्रमाणात कापणी यंत्रे उपलब्ध आहेत यावर चर्चा करण्यात अली. आता बी बियाणाचे वाटप केले जाणार असून त्यासंदर्भात खात्याच्या तयारीचा मंत्र्यांनी आढावा घेतला. श्यक्य त्या ठिकाणी घरपोच बी बियाणाच्या वाटपावर भर द्यावा असे कृषी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. ५०० सेंद्रिय क्लस्टर करण्याच्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला व संबंधित कंत्राटदारांना कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यासंदर्भात सांगण्यात आले.

 

संबंधित बातम्या