डिचोलीत वायंगण शेतीची कामे मार्गी

Dainik Gomantak
सोमवार, 20 एप्रिल 2020

कृषी व्यवसायाला आधुनिकतेची जोड मिळाल्यापासून बहूतेक शेतकऱ्यांचा यंत्राव्दारे भात कापणी आणि मळणीची करण्यावर भर असल्याचे आढळून येत आहे.

तुकाराम सावंत

डिचोली

'टाळेबंदी'मुळे लांबणीवर पडलेली डिचोलीतील बहूतेक सर्व भागातील वायंगण शेतीची अंतिम टप्प्यातील मळणीची कामे एकदाची आटोपली आहेत. दरम्यान, तालुक्‍यातील लाडफे येथील 'कळस कोंड' शेतीत खास तयार केलेल्या घरगुती यंत्राव्दारे भातपिकाची मळणी करण्यात आली आहे. डिचोलीतील साळ, मेणकूरे, लाडफे, बोर्डे, कारापूर, कुडचिरे, मये, हातुर्ली, पिळगाव, अडवलपाल आदी भागात शेतकऱ्यांनी पारंपारिक वायंगण शेती लागवड केली होती. यंदा 'टाळेबंदी' मुळे वायंगण शेतीची कापणी आणि मळणीच्या कामाबाबतीत अनिश्‍चितता निर्माण झाली होती. मात्र, शेतकऱ्यांनी ही कामे पूर्ण केली आहेत. 'कामेरी आणि मानायां ' ची कमतरता, त्यामुळे कृषी व्यवसायाला आधुनिकतेची जोड मिळाल्यापासून बहूतेक शेतकऱ्यांचा यंत्राव्दारे भात कापणी आणि मळणीची करण्यावर भर असल्याचे आढळून येत आहे. यंदाही शेतकऱ्यांनी 'कॉम्पॅक्‍टर' या यंत्राच्या सहकार्याने ही कामे पूर्ण केली आहेत.
लाडफेत खास यंत्राव्दारे मळणी !
तालुक्‍यातील लाडफे गावातील बहूतेक शेतकऱ्यांनी शेती करण्याकडे पाठ फिरवली असली, तरी अजूनही काही शेतकरी या पारंपरिक व्यवसायात आहेत. यंदाही शेतकऱ्यांनी 'कळस कोंड' शेतीत वायंगण भातपिक घेतलेले आहे. या शेतीत 'कॉम्पॅक्‍टर' हे यंत्र नेणे शक्‍य होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पध्दतीने किंवा खास तयार करण्यात घरगुती यंत्राव्दारे मळणीची कामे करावी लागते. पारंपरिक शेती व्यवसायात असले, तरी अलीकडच्या काळात गवा आदी रानटी जनावरांचा तसेच मोरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे रात्रंदिवस शेतीची राखण करावी लागते. असे अच्युत गावस आणि जयराम मळीक या शेतकऱ्यांनी सांगितले. 'टाळेबंदी'मुळे यंदा मळणीचे काम लांबणीवर पडले होते. यंदा भातपिक समाधानकारक आले आहे. असेही या शेतकऱ्यांनी सांगितले.

 

 

संबंधित बातम्या