कलात्मक कृषी वस्तूंचे प्रदर्शन

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

म्हापशातील कृषी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
विपणन कौशल्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यावर कृषी खात्याचा भर

प्रदर्शनातील नारळापासून बनवलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू.

नारळापासून बनवलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ.

कोलवाळ : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक प्राप्ती वाढवण्यासाठी शेतीबरोबरच अन्य तत्सम व्यवसायांकडे लोकांना वळवले जात आहे. गोव्यात आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच विपणन कौशल्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यावर कृषी खात्याने लक्ष केंद्रित केले आहे, असे प्रतिपादन म्हापसा विभागीय कृषी अधिकारी रघुनाथ जोशी यांनी धुळेर म्हापसा येथे केले.

नारळ, माड व बागायती, फळझाडे उत्पादन या विषयावर आयोजित केलेल्या एक दिवसीय कृषी कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी विश्राम गावकर, रघुनाथ जोशी, सोहम उसकईकर, पल्लवी शेट्ये, अश्‍विता के., योजना गावकर, गौतम अस्नोडकर, पूजा नाईक, अभिजित परब, संदीप नाईक, सर्वेश सावंत, शेतकरी नीलेश बी., दिनेश हरमलकर, मोहन कळंगुटकर व नारळापासून विविध प्रकारच्या वस्तू बनवणारे कारागीर सोनू शेटगावकर उपस्थित होते.

वैज्ञानिक नारळ लागवड तंत्रज्ञ आणि नारळ विकास मंडळ, कोची यांच्या संयुक्‍त विद्यमाने व गोवा राज्य कृषी संचालनालय यांच्या सौजन्याने कृषी विभागीय कार्यालय, धुळेर म्हापसा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेला बार्देश तालुक्‍यातील विविध भागांतील सुमारे ८० शेतकरी उपस्थित होते.

नारळाचे उत्पादन वाढवण्यासाठी खास माहिती कार्यशाळेत देण्यात आली. वक्‍त्यांनी सांगितले की, नारळाच्या रोपांची निवड करण्यासाठी रोपे किमान नऊ ते बारा महिने वयाची व पाच ते सात पानांची असणे आवश्‍यक आहे. लागवड करणे व निगा राखणे यासंबंधीही मार्गदर्शन करण्यात आले. पाऊस सुरू होण्याच्या सुमारास खड्ड्यात तळाशी पालापाचोळा घालून विविध प्रकारचे थर तयार करावेत व तीस ते चाळीस सेंटिमीटर खाली राहील अशा पद्धतीने रोप लावणे आवश्‍यक आहे.

नारळाची रोपे लावल्यानंतर सुरवातीचे एक वर्ष काळजी घेणे आवश्‍यक आहे. कडक उन्हात पाने करपू नये म्हणून एप्रिल व मे महिन्यात रोपांना सावली देणे आवश्‍यक आहे. नारळ लागवडीबरोबर मिश्र पिके घेता येतात. यात अननस, पपई, केळी, सुरण, रताळी, भाजीपाला यांचा समावेश होतो. पांढरी लिली, निशिगंध, झेंडू ही फुलपिके आंतर मिश्रपिके म्हणून घेता येतात. मात्र, अशा आंतरपिकांना आवश्‍यक ती खते व पाणी माडांना दिल्या जाणाऱ्या खताव्यतिरिक्‍त जादा देणे आवश्‍यक आहे.

यावेळी नारळापासून तयार केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरण्यात आले होते. मोरजी येथील सोनू शेटगावकर यांनी नारळापासून बनवण्यात येणाऱ्या विविध वस्तूंची माहिती दिली. अशा वस्तू बनवण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच नारळापासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांसंदर्भात स्पर्धा ठेवण्यात आली होती. उत्कृष्ट खाद्यपदार्थ बनवलेल्या तीन महिलांना बक्षिसे देण्यात आली. तसेच कार्यशाळेत नारळासंबंधी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना योग्य उत्तरे दिलेल्या शेतकऱ्यांना बक्षिसे देण्यात आली. कृषी अधिकारी रघुनाथ जोशी यांनी आभार मानले.

 

वेंडल रॉड्रिग्ज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

 

संबंधित बातम्या