पेडणे तालुक्यात वायंगण शेतीचे प्रमाण घटले

Dainik Gomantak
बुधवार, 1 जानेवारी 2020

प्रकाश तळवणेकर

प्रकाश तळवणेकर

पेडणे,  ः भरड (सर्द) व वायंगण शेती हे भात शेतीचे दोन प्रकार. पेडणे तालुका हा तसा कृषी प्रधान तालुका. पावसाळ्यात भरड तर पावसाळ्यानंतर वायंगण शेती. भरड शेती ही उंच किंवा डोंगराळ भागात केली जाते तर वायंगण शेती ही सकल भागात जिथे पाणथळ भाग आहे त्या ठिकाणी. तळी किंवा झरीचे पाणी या शेती मळ्याला नेणे शक्‍य होते अशा ठराविक ठिकाणीच वायंगण शेतीचे मळे आहेत. भरड शेतीच्या तुलनेने वायंगण शेतीचे तसे कमी प्रमाण आहे.
एकेकाळी तालुक्‍यातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय होता. पण, शिक्षणाचा प्रसार झाल्यावर नव्या पिढीला चिखल, मातीत आणि मेहनतीची कामे करणे कमीपणाचे वाटू लागल्याने बहुतांश युवा पिढी शेती व्यवसायापासून दूर गेली होती. पण, सरकारने नांगरणीसाठी पावर टिलर, ट्रॅक्‍टरसाठी तसेच पावर टिलर, ट्रॅक्‍टर, बियाणे, किटकनाशक, खत, वॉटर पंप तसेच शेतीची अन्य आयुधे खरेदीवर चांगल्यापैकी अनुदान देण्यास प्रारंभ केला. इतके असूनही शेती केली तर भात कापणी व मळणीसाठी मजूर मिळायाचे नाहीत. त्यासाठी एकाच वेळी भात कापणी व मळणी एकाचवेळी व ते कामही कमी वेळात करणारी हार्वेस्टींग यंत्रे शेजारच्या राज्यातून आणून ही यंत्रेही अनुदान पद्धतीवर शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली. या अशा अनेक कारणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी पुन्हा शेती व्यवसायाकडे परत वळला.

भरड शेतीकडे अधिक कल
सरकारच्या प्रोत्साहनामुळे व शेतीची आवड असलेला शेतकरी बऱ्याच वर्षानंतर पुन्हा शेतीकडे वळला ही गोष्ट जरी खरी असली तरी शेतकरी शेती व्यवसायाकडे पुन्हा वळला तो प्रामुख्याने भरड शेतीकडे. मात्र वायंगण शेतीकडे शेतकऱ्याने तितक्‍या गांभीर्याने पाहिले नाही, हे एक कारण असले तरी ही वायंगण शेती करण्यासाठी शेतकऱ्यांपुढे भेडसावणाऱ्या अनेक समस्याही आहेत.

वायंगण शेतीचे प्रमाण घटले...
पार्से, सावंतवाडा- मांद्रे, खाजने, पोरस्कडे, विर्नोडा, दाडाचीवाडी-धारगळ, तुये, कासारवर्णे, गावडेवाडा-कोरगाव, भाईड-कोरगाव, देवसू-कोरगाव, माईण-कोरगाव, कोनाड-कोरगाव, पालये हे वायंगण शेतीचे मळे असलेले गाव. त्यापैकी पार्से, सावंतवाडा, मांद्रे, खाजने, गावडेवाडा-कोरगाव येथील वायंगण शेतीचे मोठे मळे. १९९२च्या कृषी खात्याच्या सर्व्हेप्रमाणे पेडणे तालुक्‍यात १३८७ हेक्‍टर जमीन ही वायंगण शेती लागवडीखाली होती. सध्या हे वायंगण शेतीचे प्रमाण हे ६३६ एवढे आहे. म्हणजे गेल्या सत्तावीस वर्षात ७५१ हेक्‍टर म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त वायंगण शेतीचे उत्पन्न कमी झालेले आहे. वायंगण शेतीच्या दृष्टीने ही चिंताजनक गोष्ट आहे.कोरगाव, खाजने, मांद्रे,

वायंगण शेती पुढील समस्या
तालुक्‍यात वायंगण शेती कमी होण्यामागील अनेक कारणे न समस्या आहेत. वायंगण शेतीला पाणी पुरवठा हा या शेती मळ्यांच्या माथ्यावर असलेल्या तळ्याद्वारे किंवा झऱ्याद्वारे होतो. काही मळ्यांच्या माथ्यावर असलेल्या तळ्या बुझल्या आहेत किंवा अशा तळ्यातील झऱ्यांतून पाणी येण्याची क्षमता कमी झाल्याने शेती मळ्याला योग्य प्रकारे पाणी पुरवठा करता येत नाही. तर दुसऱ्या बाजूने दाडाची वाडी - धारगळ, विर्नोडा सारख्या शेती मळ्याजवळून तिळारीच्या पाण्याच्या मोठ्या जलवाहिनी गेल्या आहेत. या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपून येथील शेती मळ्यात दलदल निर्माण झालेली आहे. त्यामुळे अशा शेत मळ्यात बैलांचे औत, पावर टिलरसारखी यंत्रसामुग्री रुतते व काम करता येत नाही. हिवाळा-उन्हाळ्यात फक्त वायंगण शेती मळ्यातील हिरवीगार असते. तिथे पाणीही सहजपणे मिळते म्हणून रानडुक्कर, गवे, भेकरी यासारखी रानटी जनावरे या वायंगणी शेती मळ्यात येवून शेती फस्त करुन शेतीची नासाडी करतात. यामुळे शेतकऱ्यानी शेतीवर केलेला खर्च व घेतलेली मेहनत वाया जाते. पावसाळ्यात डोंगर वगैरे ठिकाणाहून पावसाच्या पाण्याबरोबर वहावून आलेला गाळ शेती मळ्यात साचल्याने मळ्यात दलदल निर्माण झालेली आहे. तर काही ठिकाणी शेती मळ्यात लहान मोठे उंचवटे तयार झाले आहेत. ज्यामुळे नांगरणी करणे कठीण होते. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची अनास्था यामुळेही वायंगणी शेती मळे पडंग पडले आहेत. काही ठिकाणचे शेतीचे मळे हे तेरेखोल, शापोरा नदीच्या जवळ आहेत. बांध मानशी यांची दुरुस्ती न झाल्याने तसेच या नद्यांचे जे फाटे काही वायंगणी शेत मळ्याजवळ आहेत हे फाटे (पोयट) बुझल्याने खारे पाणी शेतीत येवून शेतीची जमीन खराब होते. या अशा अनेक कारणास्तव दिवसेन दिवशी तालुक्‍यातील वायंगण शेतीचे प्रमाण कमी होत आहे.

उपाययोजना हवी...
वायंगण शेती टिकून रहाणे ही काळाची गरज आहे. सर्द अथवा अथवा भरड पिकापेक्षा वायंगण शेतीही शाश्‍वत शेती आहे. त्यासाठी सरकारने सर्व संबंधित खात्याशी समन्वय साधून तिळारीच्या झिरपणाऱ्या जलवाहिनीवर योग्य उपाययोजना केली पाहिजे. आवश्‍यक तर नवीन जलवाहिनी घातली पाहिजे. ज्या मळ्यात गाळ साचला आहे तसेच उंच झालेला भाग उन्हाळ्याच्या दिवसात जेणेकरुन सहजपणे काम करता येईल, यासाठी एप्रिल - मे महिन्यात काढून टाकण्यासाठी एक मोहिम राबवून वायंगण शेती करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. तरच ह्या वायंगण शेती मळ्यांचे अस्तित्त्व टिकून राहील.

संबंधित बातम्या