अन्‍साभाट, खोर्ली येथील छाप्‍यात लाखोंचा मद्यसाठा जप्‍त

Dainik Gomantak
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

टाळेबंदी असताना हा मद्यसाठा दोन ठिकाणी लपवून ठेवण्‍यात आला आहे व तेथून त्‍याची विक्री केली जात आहे, अशी तक्रार खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांकडे आल्‍यानंतर ही कारवाई करण्‍यात आली.

म्‍हापसा, ता. २३ (प्रतिनिधी) : अबकारी खात्‍याच्‍या म्‍हापसा केंद्राने आज गुरुवारी अन्‍साभाट म्‍हापसा व खोर्ली येथे टाकलेल्‍या छाप्‍यात मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्‍त केला. हा मद्यसाठा नेमका किती किमतीचा आहे, याविषयी अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्‍ध होऊ शकली नाही. तथापि हा आकडा लाखांच्‍या घरात जाणारा आहे, असा प्राथमिक अंदाज खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी व्‍यक्त केला आहे.
टाळेबंदी असताना हा मद्यसाठा दोन ठिकाणी लपवून ठेवण्‍यात आला आहे व तेथून त्‍याची विक्री केली जात आहे, अशी तक्रार खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांकडे आल्‍यानंतर ही कारवाई करण्‍यात आली. त्‍यानुसार दोन्‍ही ठिकाणी ठापे टाकण्‍यात आले. त्‍यापैकी एक आस्‍थापन फास्‍ट फूडचे असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे.
जप्‍त केलेल्‍या मालामध्‍ये विविध प्रकारच्‍या मद्यार्कांचा साठा असल्‍याने, तसेच त्‍या मालापैकी प्रत्‍येक मद्य बाटलीचे नेमके मूल्‍य काय आहे, यावरून त्‍याचे मोल ठरणार असल्‍याचे अधिकाऱ्यांनी स्‍पष्‍ट केले. त्‍यापैकी काही मद्य विदेशी बनावटीचे असू शकते, असेही ते म्‍हणाले. जप्‍त केलेल्‍या मालामध्‍ये बिअर्सचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
रात्री उशिरापर्यंत अहवाल तयार झाल्‍यानंतर पणजी येथे मुख्‍यालयातील अधिकाऱ्यांना तो अहवाल पाठवला जाईल व त्‍याबाबत वरिष्‍ठांची संमती घेतल्‍यानंतरच तो अहवाल प्रसिद्धी माध्‍यमांसमोर उघड केला जाऊ शकतो, असेही म्‍हापसा येथील अधिकाऱ्यांनी स्‍पष्‍ट केले.
यासंदर्भात संशयितांना कागदपत्रे दाखवण्‍यास कळवले होते. त्‍यामुळे रात्री आठ वाजेपर्यंत यासंदर्भात कुणालाही अटक झाली नव्‍हती. कागदपत्रांची तपासणी केल्‍यानंतरच आवश्‍‍यक भासल्‍यास संशयितांना अटक केली जाऊ शकते, असेही म्‍हापशातील अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत प्रक्रिया सुरू होती.
म्‍हापसा अबकारी कार्यालय मरड भागातील एका एका इमारतीच्‍या चौथ्‍या मजल्‍यावर कार्यरत आहे. त्‍यामुळे जप्‍त केलेला माल कार्यालयात नेईपर्यंत बराच वेळ गेला. त्‍यानंतर मद्यार्काचे नेमके मोल काय, यासंदर्भात अहवाल तयार करण्‍याचे काम सकाळी साडेसात वाजण्‍याच्‍या सुमारास सुरू करण्‍यात आले. कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
०००
फोंड्यातही कारवाई
शांतीनगर फोंड्यात येथे सुमारे ६० लाखांहून अधिक किमतीचा मद्यसाठा जप्‍त केला. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्‍याचे तेथील अबकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. टाळेबंदी असताना मोठ्या प्रमाणात मद्यसाठा कसा केला गेला, असा प्रश्‍‍न स्‍थानिकांकडून उपस्‍थित केला जात आहे.

संबंधित बातम्या