पर्यटनहंगाम ठप्‍प; मद्य विक्रेते टाळेबंदीमुळे अडचणीत

Dainik Gomantak
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

‘कोविड-१९’ मुळे राज्यात टाळेबंदी लागू झाल्यापासून पर्यटन क्षेत्र डबघाईस आले आहे.

पणजी, 

‘कोविड-१९’ मुळे राज्यात टाळेबंदी लागू झाल्यापासून पर्यटन क्षेत्र डबघाईस आले आहे. पर्यटन क्षेत्रावर राज्यातील मद्य व्यवसाय पूर्णपणे अवलंबून आहे. ७० टक्के मद्य विक्री ही पर्यटन क्षेत्रामुळे तर ३० टक्के स्थानिक लोकांच्या विक्रीतून होते. मार्च ते मे हा पर्यटक गोव्यात येण्याचा मुख्य पर्यटनकाळ असतो. या तीन महिन्यात मद्य व्यवसायाची उलाढालही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यासाठी घाऊक मद्य विक्रेते तसेच किरकोळ विक्रेतेही मालसाठा अगोदर खरेदी करत असतात, असे गोवा मद्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले.
गेल्या डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० या काळात मद्य व्यापाऱ्यांनी मद्य तसेच बियरचा साठा खरेदी केलेला असतो. या मद्य व बियरची विक्री करण्याची मुदत असते. त्या मुदतीनंतर हे मद्य किंवा बियर विक्री करता येत नाही. देशात ३ मे पर्यंत टाळेबंदी आहे. त्यानंतर पावसाळा सुरू होणार व पर्यटन मोसम संपणार आहे. त्यामुळे आगामी ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सध्याची गोव्याच्या शेजारील राज्यांची परिस्थिती पाहता तो आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मद्य व्यापारी या टाळेबंदीमुळे अडचणीत आले आहेत. सरकारने ऑनलाईन सेवा सुरू केल्याने व्यापाऱ्यांना वेळेवर विक्री अहवाल व त्याचा कर जमा करावा लागत आहे. मात्र, व्यवसायच ठप्प असल्याने या व्यापाऱ्यांचे बरेच हाल झाले आहेत, असे नाईक यांनी सांगितले.

मद्यविक्री बंद, तर मजूर तर्रर्र!
राज्यात मद्यालये तसेच मद्यविक्री टाळेबंदीच्‍या काळात बंद आहे, तरी काही परराज्यातील मजूर संध्याकाळचे रस्त्यावर तर्रर्र होऊन फिरताना दिसतात. काही मद्य विक्रेते दुकाने बंद ठेवून त्यातील मद्याच्या बाटल्या किरकोळ विकत आहेत. काही घरांमधून दारू विकली जाते त्याची माहिती नेहमी संध्याकाळी दारू पिणाऱ्या लोकांना असते. या संदर्भात खात्याकडे तक्रारी येतात. मात्र, जाऊन चौकशी करण्यापूर्वी तेथे कोणीच सापडत नाहीत. खात्याची भरारी पथके रात्रंदिवस कार्यरत आहेत, अशी माहिती अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या