आमोणा ते बाणास्तरी परिसरात रेती उपसा

Dainik Gomantak
रविवार, 3 मे 2020

रात्रभर बेकायदा वाहतूक, ग्रामस्थांत भिती, संबंधितांचे दुर्लक्ष

खांडोळा

टाळेबंदीच्या काळात महिनाभर सर्व व्यवहार बंद होते, परंतु गेल्या आठवड्यापासून मांडवीनदीच्या पात्रात रात्रीच्या वेळी बेकायदा रेती उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
नार्वे, जुवे, बाणास्तरी परिसरातील मांडवी पात्रात बेकायदा नदीतून बेकायदा मोठ्‍या प्रमाणात गुपचूपपणे रेती उपसा सुरू आहे. मध्यरात्री उपसा करून तिची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी येथील ग्रामस्थांच्या आहेत. परंतु पंचायत किंवा इतर कोणतीही संबंधित यंत्रणा त्याविरुद्ध ठोस पाऊल उचलत नसल्याने या लोकांना आश्‍चर्य वाटत आहे.
काही ग्रामस्थांनी ‘गोमन्तक'कडे या रेती उपशाविषयी संपर्क साधला होता. रेती उपशाला बंदी असताना या भागातून मध्यरात्री मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात आहे. टाळेबंदीत बांधकामांना परवानगी दिल्याने रेतीला मागणी वाढली आहे. त्यामुळे वाढीव दराने रेती विक्री करून बक्कळ फायदा उठविण्यासाठी बेकायदेशीरपणे रेती उपसा सुरू झालेला आहे. या रेती व्यवसायिकांची दादागिरीमुळे लोकही तक्रार करण्यास धजावत नाहीत.
बोटीतून रेती काढली जात असून, या कामासाठी मोठ्‍या प्रमाणात परराज्यातील मजूर काम करतात. मध्यरात्री रेतीचा हा उपसा केला जात असल्याने यामागे कोणाकोणाचे लागेबांधे आहेत, याची चर्चा सध्या बाणास्तरी परिसरात सुरू आहे. कोणाच्या तरी राजकीय वरदहस्ताशिवाय हे काम होणार नाही, हेही सर्वांना ज्ञात आहे. परंतु सध्या हा व्यवसाय जोरात आणि जोमात सुरू आहे. मध्यरात्री डंपर रेतीची वाहतूक करीत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महसूल खात्याने याकडे लक्ष देणे आवश्‍यक असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कोणताही ग्रामस्थ नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवरच याविषयी बोलत आहे.
खांडोळ्याच्या बाजूने रेती उपसा बंद असून आमोण्याच्या बाजूला रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हा प्रकार ग्रामस्थांना माहिती आहे, परंतु लोकप्रतिनिधी मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कारवाई होत नाही. बांधकामाला गेल्या काही दिवसात गती आल्यामुळे रेतीची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आले. दरही वाढले आहेत, हा फायदा लाटण्यासाठीच बिनधास्तपणे रेती उपसा सुरू आहे, असे काही ग्रामस्थांनी सांगितले.
रात्रभर रेती उपसा सुरू असल्यामुळेच पहाटेपर्यंत माशेल, खांडोळा, बाणास्तरी मार्गावर ट्रकची ये-जा सुरू असते. याकडे रात्रीच्या वेळी गस्त घालणारे पोलिसही काहीच कारवाई करीत नाहीत. टाळेबंदीत त्यांना रात्रीची सवलत दिली आहे का? असा सवालही पर्यावरणप्रेमीतर्फे करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या