Pramod Yadav
म्हादईप्रेमींनी शनिवारी अरबी समुद्राच्या किनारी हजारोंच्या संख्येने एकत्र येत मानवी साखळी तयार करीत ‘म्हादई’ वाचविण्याची साद घातली.
या जनआंदोलनाद्वारे म्हादईबाबतची लोकचळवळ अधिक दृढ करण्याचा निश्चय करण्यात आला.
राज्य सरकारला पुन्हा जागे करण्यासाठी आणि कर्नाटकात नव्याने निवडून आलेल्या काँग्रेस सरकारलाही ‘म्हादई बचाव''चा लढा सुरूच राहील, हा संदेश या मानवी साखळीतून देण्यात आला.
म्हादई बचाव, गोवा बचाव आघाडी, हेरिटेज ॲक्शन ग्रुप, ऑर्थिव्हीस्ट कलेक्टिव्ह, अभिव्यक्ती सांस्कृतिक संघ, यासारख्या समविचारी संस्था यावेळी एकत्र आल्या.
या मानवी साखळीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आपचे नेते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
दुपारी तीन वाजल्यापासूनच करंजाळेपासून मिरामार किनाऱ्यावर कार्यकर्ते जमले होते. काही कार्यकर्त्यांनी मांडवी जेटी येथे म्हादई बचावच्या घोषणा दिल्या.
म्हादई संवर्धनासाठी जनजागृती आणि चळवळ सक्षम करण्याकरिता हा जागरोत्सव आयोजित केला होता.
प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना इम्फाना कुलकर्णी यांनी टीमसह मांडवी नदीमध्ये बोटीत संगीतासह नृत्य सादर केले.
गायिका हेमा सरदेसाई यांनी ‘नितळ आणि शीतळ उदक तुझे, व्हावता तू गोंयच्या नदिनी, म्हादई आमची माय, म्हादई आमची माय’, हे सुरेल गीत सादर केले.