आयएसएल पुन्हा जिंकण्याचे अनिरुद्धचे लक्ष्य

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

पणजीः चेन्नईयीन एफसीचा युवा मध्यरक्षक अनिरुद्ध थापा याने कारकिर्दीत दुसऱ्यांदा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्य बाळगले आहे. चेन्नईच्या संघाने २०१७-१८ मोसमात स्पर्धा जिंकली होती, तेव्हा तो विजयी संघाचा सदस्य होता.

पणजीः चेन्नईयीन एफसीचा युवा मध्यरक्षक अनिरुद्ध थापा याने कारकिर्दीत दुसऱ्यांदा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्य बाळगले आहे. चेन्नईच्या संघाने २०१७-१८ मोसमात स्पर्धा जिंकली होती, तेव्हा तो विजयी संघाचा सदस्य होता.

अनिरुद्ध २२ वर्षांचा आहे. मध्य फळीतील या खेळाडूने आपल्या अप्रतिम कौशल्याच्या जोरावर चेन्नईयीनच्या वाटचालीत मोलाचा वाटा उचलला आहे. यंदाच्या मोसमात त्याने सहा असिस्ट नोंदविले आहेत, तर प्ले-ऑफ फेरीच्या पहिल्या टप्प्यात चेन्नई येथे एफसी गोवाविरुद्ध त्याने गोलक्षेत्राबाहेरून फटका मारत अप्रतिम गोलही नोंदविला होता. शनिवारी (ता. १४) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर विजेतेपदासाठी चेन्नईयीन एफसीसमोर एटीके एफसीचे आव्हान असेल.

एफसी गोवाविरुद्ध केलेल्या गोलविषयी अनिरुद्धने सांगितले, की ‘‘मी गोल करण्याचे प्रयत्न करावेत असे संघातील प्रत्येकाला वाटत होते. संपूर्ण मोसमात मला गोलक्षेत्राबाहेरून संधी मिळण्याची आशा होती. आमचे आघाडीवरील चार खेळाडू छान समन्वय राखून खेळतात. त्यामुळे मला सहसा आघाडीवर फारशी संधी मिळत नाही. मी प्रयत्न करायला हवा असा विचार मनात आला आणि मी तो केला.’’ चेन्नईयीन एफसीकडून तो मार्को माटेराझी, जॉन ग्रेगरी आणि ओवेन कॉयल अशा तीन मातब्बर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तो खेळला आहे.

अनिरुद्ध म्हणाला, की ‘‘१८ वर्षांचा असताना आयएसएल विजेता बनण्यात मी सुदैवी ठरलो. आता मी पुन्हा अंतिम फेरीत दाखल झालो आहे. अशा सामन्यांमुळे मला मोलाचा अनुभव मिळतो. या लढती नेहमीआय तुमच्या लक्षात राहतात.’’ अनिरुद्धने चेन्नईयीनच्या मध्यफळीत जर्मनप्रीत सिंग आणि एडविन वॅन्सपॉल यांच्या साथीत यापूर्वीच छान समन्वय साधला आहे. उत्तराखंडमद्ये जन्मलेल्या या खेळाडूला मुख्य प्रशिक्षकांनी भारतीय मध्यरक्षकांच्या क्षमतेवर विश्वास दाखविल्याबद्दल आनंद वाटतो आणि तो यासाठी कृतज्ञ आहे.

अनिरुद्ध म्हणाला, की ‘‘मला प्रशिक्षकांचे आभार मानायचे आहे. प्रत्येकाला गोलच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने परदेशी खेळाडू लागतात. ओवेन यांची मात्र भूमिका चांगली आहे. ते आमच्यावर भरोसा ठेवतात. एडवीन छानच स्थिरावला आहे. त्याला खेळाचे उत्तम आकलन होते. मी जर्मनच्या साथीत खेळलो आहे. आमच्यातही समन्वय आहे. एडवीनच्या बाबतीतही हेच लागू होते. आमचे आक्रमण चांगले असल्याची कल्पना आहे. त्यामुळे आम्ही त्यांना साथ देऊ शकलो तर यशस्वी ठरू शकतो.’’

मोसमात एका टप्यास तळात राहिलेल्या चेन्नईयीनने आता अंतिम फेरीत मुसंडी मारली आहे. प्रशिक्षक ओवेन यांनी संघाचे दैव पालटले आहे. अनिरुद्ध माजी विजेत्यांसाठी १९ सामने खेळले आहेत. यात १८ वेळा त्याला स्टार्ट मिळाली. आता आणखी एका महत्त्वाच्या सामन्यात आपण सहभागी होऊ शकू आणि हा क्षण अविस्मरणीय ठरेल अशी त्याला आशा आहे.
 

संबंधित बातम्या