सीएए विरोधी सभा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

सीएए मुस्लीम विरोधी : आल्वारीस
विधानसभा अधिवेशन बंद पाडण्याचा मडगावच्या सीएए विरोधी सभेत इशारा

सावियो फर्नांडिस यांनी बोलताना सीएए, एनआरसी आणि एनपीए काढून टाकण्यासंदर्भात काहीच आश्‍वासन सरकारकडून न मिळाल्याने लोकांना रस्त्यावर उतरावे लागले, असे सांगितले.

नावेली:  केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) मागे घ्यावा अन्यथा ३ फेब्रूवारीपासून सुरू होणारे गोवा विधानसभा अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा मडगावात कोलवा सर्कल जवळ सिटीझन ऑफ गोवाच्या झेंड्याखाली आयोजित सभेत राज्य सरकारला देण्यात आला. जोपर्यंत सीएए मागे घेतला जात नाही तोपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सीएए मुस्लीम विरोधी असल्‍याचे आल्वारीस यांनी सांगितले.सभेला फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई व बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमांव, नगराध्यक्षा पूजा नाईक, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो उपस्थित होत्या.

लोकशाहीत सरकारने लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायचे असते. एनसीआर व एनपीए जर सरकारने पुढे नेले तर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्‍यता फर्नांडिस यांनी व्यक्त केली. राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी लोक उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही सर्व जण एकजूट आहोत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यावर पोलिसांनी अत्याचार केले तरी हे आंदोलन सुरूच रहाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
रामा काणकोणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हिटलर असे संबोधले. या दोघांकडून आम्हाला आजादी हवी आहे. ३ फेब्रुवारीपासून सुरू होणारे विधानसभा अधिवेशन सीएए विरोधातील कार्यकर्ते सुमारे २० ते ३० हजारांच्या संख्येने लोकांना घेऊन विधानसभा बंद पाडू असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना यावेळी दिला. तसेच गोव्यातील प्रत्येक पंचायतीने सीएएच्या विरोधात ठराव मंजूर करून आपल्या संबंधित आमदारांना द्यावा. येत्या विधानसभेत गोव्याच्या चाळीस आमदारांना लोकांसाठी ठराव घ्यावा लागला, असे काणकोणकर यांनी सांगितले.

सीएए विरोधात लढा देण्यासाठी अशाच मोठमोठ्या सभा घ्याव्यात व सगळ्यांनी एकजुट रहावे, असे आवाहन आल्वारीस यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याने ते लोकांची दिशाभूल करण्यात पटाईत आहेत, असा मुद्दा पॉप्युलर फ्रंटचे मुझफ्फर शेख यांनी मांडला, असे त्यांनी सांगितले.
सभेसाठी गोव्याच्या महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात आले होते. सुरवातीला रवींद्र भवन ते कोलवा सर्कलपर्यंत रॅली काढण्यात आली. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. हजारोंच्या संख्येने लोक सभेस उपस्थित होते.

 

रेल्वे सरव्यवस्थापकाची अपमानप्रकरणी माफी

संबंधित बातम्या