अर्थविश्‍व

Dr. Manoj Kamat
सोमवार, 6 जुलै 2020

कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहण्याची सवय जडलेल्या आम्हा सगळ्यांना दुसरा वाढता आकडा पाहून उत्साह आणि कुतूहलाची जाणीव व्हावी. मागील आठवड्यापर्यंत भारतातील मुद्रासाठ्याचा आकडा ५०५ अब्ज डॉलर्स पार करून देशाने ऐतिहासिक कामगिरी बजावली.

परकीय चलन गंगाजळीत ऐतिहासिक वाढ

विदेशी मुद्रा साठ्याच्या बाबतीत भारत आता जगातील पाचवी मोठी शक्ती ठरली असून, चीन, जपान, रशिया व स्वित्झर्लंड या देशांच्या मांदियाळीत आपल्याला स्थान मिळाल्याची बातमी कौतुकास्पद ठरावी. पुढील १३ महिन्यांचा आयात खर्च भागविण्या इतका, देशाचे ८८ टक्के बाह्य कर्ज शमविण्याइतके किंवा देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास पाचव्या भागाइतपत आपला मुद्रासाठा वाढला असून मागील तीस वर्षात आपण देशातील कायापालटाचा एक मोठा पल्ला गाठला आहे, असे म्हणावे लागेल.
मार्च १९९१ मध्ये भारतातील विदेशी चलन साठ्याचा आकडा ५.८ अब्ज डॉलर्स इतक्या भयंकर निच्चांकी पातळीवर घसरला होता. देशातील राखीव सोन्याचा साठा विदेशात तारण ठेवून भारताने विदेशी चलनाचे कर्ज उठवत येऊ घातलेल्या मोठ्या आर्थिक संकटापासून कसा बसा बचाव केला होता. त्या अर्थसंकल्पातून मग पुढे आर्थिक सुधारणा, उदारीकरण, जागतिकीकरण व खासगीकरणाचे बीज देशात रोवले गेले व सर्व विकास आघाड्या चीत करून आपण हा मोठा पल्ला गाठला आहे.
जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात आपण ५०० अब्ज डॉलर्सचा पल्ला पार केला होता तर मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यापासून आपल्या गंगाजळीत ३२ अब्ज डॉलर्सची वाढ नोंद झाली होती. मागील तीस वर्षातील गंगाजळीतील भरभराट एक मोठी बातमी ठरावी.

विदेशी चलन गंगाजळी कशासाठी?
विदेशी चलन गंगाजळी आपला राखीव आर्थिक साठा असून ते सोने, परकीय चलन, भांडवली गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून मिळू शकणारी उधारी किंवा विशेष रेखांकन अधिकाराचा साठा असून हा साठा रिझर्व्ह बँकेकडून नियंत्रित होतो.
भरपूर विदेशी चलन साठा (गंगाजळी) असणे हे आपले आर्थिक स्वावलंबनाचे लक्षण असून अनिश्‍चित वेळ-प्रसंगासाठी तोंड देण्यासाठी आपल्या आर्थिक सुरक्षेचे ते द्योतक आहे. थोडक्यात, ही गंगाजळी म्हणजे आपली सुबत्ता किंवा श्रीमंती नव्हे. देश श्रीमंत होतो आंतरिक आर्थिक वाढीतून किंवा उच्च विकास दरमार्गे. देशांतर्गत उत्पादन वाढले की, देशाचे उत्पन्न वाढते व त्यातून येते ती सुबत्ता. गंगाजळी म्हणजे राखीव निधी व त्यापासून देशाला मिळते ती आर्थिक सुनिश्‍चितता. आपल्या देशातील चलनास समर्थता देण्यासाठी लागणारी क्षमता किंवा देशाचा विनिमय दर व्यवस्थापन करण्याच्या उद्दीष्टांच्या समर्थनार्थ परकीय चलनाची आवश्‍यकता असते. आर्थिक संकटांच्या प्रसंगी किंवा बाह्य कर्ज घेण्यासाठी देशातील चलनाची तरलता राखण्यासाठी किंवा बाह्य असुरक्षा मर्यादित करण्यासाठी परकीय चलन गंगाजळीचा सुरक्षा निधी म्हणून उपयोग होतो.

गंगाजळी वाढीची तीन कारणे
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सरकारने कंपनी कर संरचनेत सवलत घोषित केल्यानंतर विदेशी मुद्रा साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. विदेशी मुद्रा साठीची तीन महत्त्वाची कारणे ठरली. देशात वाढलेली विदेशी गुंतवणूक, घटती व्यापार तूट व आंतरराष्ट्रीय तेल बाजारात झालेल्या तेल किंमतीतील प्रचंड घट.

देशात विदेशी गुंतवणूक परकीय चलनात येते व त्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. थेट परकीय गुंतवणूक व वितरीत परकीय गुंतवणूक (फॉरेन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट्स व फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट)
थेट परकीय गुंतवणूक (किंवा एफडीआय) मध्ये गुंतवणुकदार परदेशात थेट व्यवसाय प्रस्थापित करण्याकरिता गुंतवणूक करतात. नवा व्यवसाय सुरू करणे, प्रचलित व्यवसाय खरेदी करणे किंवा नवीन कारखाने, गोदामे स्थापन करणे किंवा मालमत्ता विकत घेणे या कारणांसाठी विदेशी चलन देशात आणल्यास त्याला थेट (डायरेक्ट) गुंतवणूक म्हणतात. एफपीआय (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट) किंवा प्रबंधीत (वितरीत) विदेशी गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदार थेट विदेशी व्यवसायात हात-पाय पसरण्यापेक्षा देशातील प्रस्थापित उद्योगांमध्ये अप्रत्यक्षरित्या समभाग विकत घेऊन किंवा त्यांना कर्ज देऊन त्या उद्योगांतून आपले उत्पन्न/स्वारस्य निर्माण करतात. थोडक्यात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक ही दीर्घकालीन तर अप्रत्यक्ष (पोर्टफोलिओ) गुंतवणूक ही तात्पूर्ती असते.
गेल्या दोन-तीन महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात अनेक उद्योगधंद्यात आपली भागिदारी निर्माण केली. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२० मध्ये ४ अब्ज डॉलर्स तर एप्रिलमध्ये पुन्हा २ अब्ज डॉलर्सने वाढ नोंद झाली. तुलनेत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३ देशांत २.७५ अब्ज डॉलर्स रुपी अप्रत्यक्ष गुंतवणूक भारतात झाली. एकट्या रिलायन्सच्या जिओ या कंपनीमध्ये ९७ हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक जोडली गेली.
गेल्या चार महिन्यांत देशातील निर्यातीच्या तुलनेत आयात प्रचंड घसरल्यामुळे व्यापार तूट (दरी) मागील १३ वर्षांच्या नीच्चांकी पातळी व दिलासादायकरित्या घसरली. आपला देश सेवा व उत्पादनांच्या बाबतीत तसा आत्मनिर्भर नाहीच. आपली आयात आपल्या निर्यातीपेक्षा जास्त असल्यामुळे व्यापार तूट जाणवते. याचाच अर्थ आपल्याला जास्त प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागते. मागील तीन-चार महिन्यांत देशात फारच कमी प्रमाणात मागणी असल्यामुळे व ग्राहकांच्या संकुचितपणात लॉकडाऊनमुळे वाढ झाल्याने आयातीसाठी कमी डॉलर्स खर्च केले गेले. देशांतर्गत बाजारपेठेत कमी मागणी ही चिंताजनक प्रवृत्ती जरी दर्शवत असली, तरी आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत ती कमी आयातीचे निर्देशन करते. आयातीत प्रचंड कपात झाल्यामुळे आपल्या परकीय चलनाचा खर्च वाचला, हे ठरले दुसरे कारण.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत मोठी घट झाल्यामुळे तेलाच्या आयातीत आपला मोठा फायदा जाणवला व आपले मौल्यवान परकीय चलन वाचले. कोरोना संकटामुळे परदेशी प्रवासात घट झाली व परदेशस्थित भारतीयांनी मोठ्या प्रमाणात पैसे (परदेशी चलनात) भारतात पाठविल्यामुळे देशातील परकीय चलनसाठा वाढला.

कठीण काळात आधार
आपल्या वाढत्या परकीय गुंतवणुकीमुळे कोरोनाशी निकराची झुंज देणाऱ्या केंद्र सरकारला मोठे पाठबळ लाभले आहे. येत्या काही महिन्यांत आर्थिक मंदीचे ढग अतिगडद होत असताना आंतरिक आर्थिक समस्या हाताळताना सरकारला दिलासा मिळेल. पुढील वर्षभरात आर्थिक किंवा सैनिकी सुरक्षेसंदर्भात कुठलेही संकट उद्भवल्यास देशाचे आयात बील वर्षभर भरून काढण्यासाठी आपल्याकडे आता पुरेसा निधी आहे. वाढत्या परकीय साठ्यामुळे डॉलरच्या तुलनेत आपला रुपया मजबूत होण्यास मोठी मदत झाली आहे. बाह्य कर्जाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठीही सरकारला पुरेशी मदत आता मिळाली असून, पुढील वर्षभरासाठी आपत्ती, असुरक्षितता व आपत्कालीन परिस्थितीसाठी आता आपण सज्ज ठरू.
पुढे वर्षभरात धोरणात्मक निर्गुंतवणूक मार्गातून अपेक्षित असलेली महसूल रक्कम मिळण्यात सरकारला अपयश आल्यास (तशी शक्यता अधिकच आहे.) आपल्याकडे असलेला मोठा परकीय चलन साठा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले मानांकन कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

संबंधित बातम्या