१ जानेवारीपासून आपल्या आयुष्यात काही गोष्टी बदलून जाणार आहेत? सविस्तर वाचा..

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून जुन्या काही गोष्टी बदलून जाणार आहेत. त्यांच्याजागी कोणत्या नवीन गोष्टी येणार आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

२०२० वर्ष संपून आता काही तासांमध्येच २०२१ या नववर्षाचे आगमन होणार आहे. मागील वर्षापेक्षा अनेक गोष्टींसाठी हे वर्ष वेगळे ठरणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून जुन्या काही गोष्टी बदलून जाणार आहेत. त्यांच्याजागी कोणत्या नवीन गोष्टी येणार आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.    

१) प्रत्येक गाडीवर फास्टॅग आवश्यक- 

नवीन वर्षात तुम्ही शहरातून कुठे बाहेर जात असाल तर आपल्या गाडीवर फास्टॅग लावणे तुम्हाला आवश्यक असेल. १ जानेवारी २०२१ पासून देशभरातील गाड्यांना फास्टॅग लावणे गरजेचे आहे. असे न केल्यास दंड आकारण्यात येणार आहे. यासंबंधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी  यांनी २४ डिसेंबरलाच घोषणा केली आहे. गाडीला फास्टॅग लावलेला नसेल तर १ जानेवारीपासून टोल प्लाझावर मार्शल आपल्या वाहनाला फास्टॅग रांगेत उभे राहू देणार नाही. फास्टॅग न लावता आपण रांगेत घुसण्याचा प्रयत्न केला तर आपल्या गाडीला जेवढा टोल आकारण्यात येतो त्याच्या दुप्पट टोल आकारला जाईल.  

२) २ हजाराच्या जागी आता ५ हजारांचे कॉन्टॅक्टलेस पेमेंट-

डेबिट कार्डच्या माध्यमातून आरबीआयने कॉन्टॅक्टलेस पेमेंटची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. १ जानेवारी २०२१पासून हा नियम लागू होणार आहे. नवीन टेक्नीकच्या क्रेडीट आणि डेबिट कार्डाला पेमेंट मशीनमध्ये स्वाईप करावे लागत नाही. मशीनवर टच करूनच पेमेंट केले जावू शकते. या प्रकारच्या पेमेंटमध्ये पीन नंबरही टाकावा लागत नाही. 

३) पॉझिटीव्ह पे द्वारे मिळणार  जास्त सुरक्षा-

ऑगस्ट २०२० मध्ये आरबीआयने बँकांच्या चेक क्लिअरंस संबंधी नवीन नियम घोषित केला होता. यालाच पॉझिटीव्ह पे सिस्टीम असे म्हटले गेले. याची ही सुरूवात  १ जानेवारी २०२१ पासून होणार आहे. ग्राहकांची सुरक्षा वाढवण्यासाटी ५० हजार रूपये आणि याहून वरच्या सर्व पेमेंट वर पॉझिटीव्ह पे व्यवस्था लागू  होणार आहे.  

४) या डिवाइसवरून गायब होणार व्हॉट्सअप

१ जानेवारीपासून काही मोबाईल डिव्हाईसवरून व्हॉट्सअप वापरता येणार नाही. काही फोन मॉडेल्सवर व्हॉट्सअप आपला सपोर्ट बंद करणार आहे. अतिशय जुन्या प्रकारचे ऑपरेटींग सिस्टीम असलेल्या फोन्सवर व्हॉट्सअप चालणार नाही. अँड्रॉईड ४.०.३ या आणि यांसारख्या जुन्या डिव्हाईसेसचा यात समावेश आहे. यासाठी लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन असलेले फोन ग्राहकांना घ्यावे लागणार आहेत. आपण आयफोन वापरकर्ते आहात तर iPhone4 आणि त्याच्या आधीचेही मॉडेल्सही कालबाह्य होणार आहेत. मात्र, iPhone 4S, iPhone 5, iPhone 5S, iPhone 5C, iPhone 6, and iPhone 6S यांना  iOS 9 वर अपडेट करू शकता.   

५) जीएसटीच्या नियमांमध्येही होणार बदल

या बदलांचा सामान्यांच्या आयुष्यावर काही फरक पडत नसला तरी छोट्या दुकानदारांसाठी मात्र हे नियम बदलत आहेत. ५ कोटी रूपयांपर्यंतची वार्षित उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना आता वर्षभरात फक्त ८ जीएसटी सेल्स रिटर्न्स भरावे लागणार आहेत. याआधी १२ रिटर्न्स भरावे लागत होते. चार रिटर्न्स जीएसटीआर ३बी चे आणि चार रिटर्न जीएसटीआर-१ चे असे एकूण ८ रिटर्न्स  आता भरावे लागणार आहेत. या नवीन नियमांचा देशातील अनेक उद्योगधंद्यांवर पडणार आहे. कारण एकूण जीएसटी भरणाऱ्यांपैकी ९२ टक्के हेच लोक आहेत. 

६) युपीआय(UPI)पेमेंटवरही आता शुल्क लागणार नाही- 

युपीआय पेमेंटच्या माध्यमातून पेमेंट करताना शुल्क द्यावे लागेल असे गेल्या काही महिन्यांपासून बोलले जात होते. मात्र, पीआयबी आणि एनपीसीआय या संस्थांनी स्वत: यावर  खुलासा दिला आहे. युपीआय पेमेंटवर यापुढे कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. 

संबंधित बातम्या