खनिज निर्यातीला बार्जचा लगाम

Dainik Gomantak
शनिवार, 16 मे 2020

चौगुले कंपनीचे लोह खनिज नेण्यासाठी दोन, फोमेंतोसाठी दोन, साळगावकर कंपनीसाठी एक, माईंडस्केप कंपनीसाठी १ आणि ब्लू शार्क कंपनीसाठी एक जहाज मुरगाव बंदरात आले आहे.

पणजी

लोह खनिज नेण्यासाठी एकाचवेळी मुरगाव बंदरात सहा मोठी जहाजे दाखल झाली आहेत. त्यापैकी चार जहाजांवर खनिज माल चढवण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र राज्यात मोठ्या संख्येने बार्ज उपलब्ध नसल्याने खाण व्यावसायिकांची स्थिती चणे आहेत पण दात नाहीत अशी झाली आहे. बार्ज मालकांनी आज राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन बार्ज दुरूस्तीसाठी शंभर कोटी रुपये तातडीने उपलब्ध करण्याची मागणी केली.
चौगुले कंपनीचे लोह खनिज नेण्यासाठी दोन, फोमेंतोसाठी दोन, साळगावकर कंपनीसाठी एक, माईंडस्केप कंपनीसाठी १ आणि ब्लू शार्क कंपनीसाठी एक जहाज मुरगाव बंदरात आले आहे. त्यापैकी एक जहाज बंदराच्या बाहेर असून त्यात फोमेंतोच्या मारीया लॉरा फ्लोटींग क्रेनच्या मदतीने खनिज माल भरण्याचे काम सुरु झाले आहे. इतर जहाजे पाण्यात घट्ट करून ठेवलेल्या तराफेवजा धक्क्यांना बांधून ठेवण्यात आली आहेत. या जहाजांची प्रत्येकी क्षमता ५०-६० हजार टनांची आहे. राज्यात २ हजार टनांच्या काही बार्ज असून इतर बार्ज त्याहून लहान आहेत. एकावेळी दोन बार्ज प्रवासात असतात, दोन बार्ज भरल्या जात असतात आणि चार बार्ज खाली केल्या जात असतात. त्यामुळे एका जहाजाला मोठ्या आठ बार्जची गरज असते. एका जहाजावरद दिवसभरात साधारणतः ८ हजार टन खनिज माल चढवला जातो. वादळी हवामानात हे प्रमाण घटते, पावसाळयात तर खनिज माल चढवता वा उतरवता येत नाही.
जहाजे आहेत, खनिज निर्यात सुरु होत आहे पण बार्ज नाहीत अशी स्थिती उद्‍भवली आहे. यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मनोज काकुले, गोवा बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव, बार्ज व्यावसायिक चंद्रकांत गावस यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर जाधव यांनी सांगितले, की खाणी सुरु केल्या तर गोमंतकीयांच्या हातात पैसे येऊ शकतील. जहाज बंदरातून गेल्यावर १० दिवसात पैसे येतील. ते पैसे स्थानिक अर्थव्यवस्थेच येणार असल्याने लोक आपल्या उद्योगांकडेही वळू शकतील याकडे आम्ही राज्यपालांचे लक्ष वेधले.
ते म्हणाले, खाणकाम बंद झाले तेव्हा ३६६ बार्ज राज्यात होत्या. खनिज निर्यातदारांच्या ६२ होत्या आणि आमच्या कंपन्यांच्या ३०४ होत्या. आता खनिज निर्यातदारांच्या ३४ बार्ज शिल्लक असून त्यापैकी १३ सुरु आहेत. कंपन्यांकडे ८० मोठ्या तर ३० छोट्या बार्ज आहेत. १५ छोट्या बार्ज रेडी बंदरात आहेत. उर्वरीत १५ पैकी २ बार्जच दुरुस्तीनंतर सुरु आहेत. मोठ्या ८० बार्ज ( दोन हजार टनांच्या) आहेत त्यापैकी गोव्याबाहेर २८ बार्ज आहेत, उर्वरीत ५२ पैकी १७ बार्ज सुरु झाल्या आहेत.  सहा जहाजांत खनिज भरण्यासाठी ४८ बार्ज हव्या आहेत. २२ बार्जवर खनिज निर्यात सुरु झाली आहे. मात्र वेळेवर जहाजात खनिज न भरल्याची भरपाई विदेशी चलनात खाण कंपन्यांना भरावी लागणार आहे. बार्ज दुरुस्त करण्यासाठी वित्त पुरवठ्याची गरज आहे. बार्ज दुरुस्त करायला चार महिने लागतील हेही त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले आहे.

संबंधित बातम्या