घाबरण्याचे कारण नाही, ‘व्हीपीके’ सुरक्षित

घाबरण्याचे कारण नाही, ‘व्हीपीके’ सुरक्षित
vpk pc

फोंडा

‘व्हीपीके’ अर्बन सोसायटीची आर्थिक स्थिती भक्कम असून ग्राहक व भागधारकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, तुमच्या सर्व ठेवी व पैसे व्हीपीकेकडे सुरक्षित असल्याची ग्वाही व्हीपीके अर्बनचे अध्यक्ष सूर्या गावडे यांनी म्हार्दोळ येथे व्हीपीकेच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी व्हीपीके अर्बनचे उपाध्यक्ष पांडुरंग गावडे, संचालक हिरू खेडेकर, रोहिदास गावडे, रामा गावडे, सावित्री वेलिंगकर, दिना बांदोडकर, रोहिदास प्रियोळकर, रोशन गावडे, व्यवस्थापकीय संचालक अशोक गावडे व सरव्यवस्थापक संतोष केरकर आदी उपस्थित होते.
व्हीपीकेच्या मुख्य म्हणजे एनपीए कर्ज परताव्याच्या कारणावरून सरकारच्या सहकार निबंधकांनी व्हीपीकेच्या आर्थिक व्यवहारांवर काही निर्बंध लावले आहेत. त्यात ग्राहकाला एका महिन्यात व्हीपीके अर्बनमधून केवळ वीस हजार रुपये काढता येतील ही अट घातल्याने ग्राहक धास्तावले आहेत. राज्यातील अन्य काही आर्थिक फटका बसलेल्या बॅंकांच्या यादीत व्हीपीके आली आहे काय, या ग्राहक व भागधारकांच्या चिंतेमुळे आर्थिक व्यवहाराचा फटका व्हीपीके व इतर सहकारी पतसंस्थांनाही बसला असून वीस हजार रुपये कमाल मर्यादा ठेवल्याने ती काढून टाकावी तसेच बॅंक कर्जावरील मर्यादा व इतर निर्बंध हटवण्याची मागणी व्हीपीके संचालक मंडळाने सहकार निबंधकांकडे केली आहे.
व्हीपीकेवर निर्बंध लादल्यानंतर संचालक मंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सहकारमंत्री गोविंद गावडे यांच्याशी भेट घेतली असता त्यात सकारात्मक चर्चा झाल्याने व्हीपीकेला दिलासा मिळाला असून निर्बंधांमुळे ग्राहक व भागधारकांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांनी सांगितले असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
व्हीपीके अर्बनचा ‘एनपीए’ कर्ज परतावा मंदावला असल्याने तसेच सत्तावीस वर्षांत फक्त गेल्याच वर्षी नुकसान झाल्याने हे निर्बंध लावले असल्याचे सांगण्यात आले. व्हीपीके अर्बनची आर्थिक स्थिती भक्कम असून ७०० कोटी ठेवी, कर्ज व इतर उचल ५३० कोटी, बॅंकांतील ठेवी २९० कोटी तसेच जमीन व इमारती मालमत्ता सुमारे दीडशे कोटी रुपयांची असल्याचे यावेळी अध्यक्ष सूर्या गावडे यांनी सांगितले. व्हीपीके अर्बनच्या ४२ शाखा असून पावणे तिनशे कर्मचारी तसेच दीडशे पिग्मी एजंट आहेत. निर्बंधांनंतर लगेच सहकारमंत्र्यांकडे बैठक झाली त्यात आर्थिक व्यवहारासंबंधी चर्चा करण्यात आली. सहकार निबंधकांनीही एनपीए कमी करणे तसेच इतर खर्चासंबंधी कृती आराखडा त्वरित सादर करण्याची सूचना व्हीपीकेला केली आहे. त्यानुसार येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा कृती आराखडा सरकारला सादर केला जाईल, असे सूर्या गावडे यांनी सांगितले.
व्हीपीकेने दिलेल्या काही मोठ्या रकमेच्या कर्जाची परतफेड झालेली नाही. त्यामुळेच एनपीए वाढला आहे. सक्तवसुलीसाठी तसेच मालमत्ता जप्त करण्यासंबंधी व्हीपीकेला यापूर्वी सरकारने अधिकार दिले नव्हते, मात्र आता हे अधिकार दिल्याने या कर्जाची वसुली करण्यात येणार आहे. ग्राहक व भागधारकांचे पैसे व्हीपीकेत सुरक्षित असून कुणीही चिंता करू नये असे संचालक मंडळाने यावेळी सांगितले.
दरम्यान, व्हीपीकेच्या संचालक मंडळाची मुदत संपली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

खाणीशी संबंधित कर्जाचा
१२ कोटींचा फटका!

खाणबंदीचा फटका बसल्याने २०१२ नंतर व्याजमाफीची सरकारने सूचना केल्यामुळे या सूचनेनुसार व्हीपीकेने कार्यवाही केली असता बॅंकेला सुमारे १२ कोटी रुपयांचा फटका बसला. त्यातच नोटाबंदी आणि आता कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने व्हीपीकेच्या आर्थिक व्यवहारांवरही परिणाम झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com