राज्यातील लघु उद्योगांना पॅकेज  

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

सुभाष देसाई यांची माहिती; तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई

केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना मदत करण्याचे नियोजन करत आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाईल. याद्वारे लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.
कोरोनामुळे ठप्प झालेले उद्योगचक्र हळूहळू गतिमान होत आहे. सध्या राज्यात पन्नास हजार उद्योग सुरू झाले असून, त्यात 13 लाख कामगार रुजू झाले आहेत. 43 हजार कारखान्यांनी परवाने मागितले आहेत. दरम्यान, रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यापार व दुकाने सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत 1 जूननंतर निर्णय घेऊ शकतो, असेही देसाई यांनी सांगितले. औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाणार आहे. त्यासाठी पोर्टल तयार करण्याचे काम सुरू आहे. या पोर्टलद्वारे कुशल-अकुशल मनुष्यबळाची नोंदणी केली जाणार आहे. याद्वारे ज्या ठिकाणी कामगारांची गरज असेल, त्या ठिकाणी कामगारांचा पुरवठा केला जाणार आहे. याशिवाय विदेशी गुंतवणुकीसाठी एमआयडीसीकडे 40 हजार हेक्‍टर जमीन सर्व सुविधांसह सज्ज आहे. विदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. देश-विदेशातील लघु उद्योगांनी आपल्या प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्राची निवड करावी, असे आवाहन उद्योगमंत्र्यांनी केले.

संबंधित बातम्या