कोरोनामुळे 100 वर्षांतील सर्वात मोठे अर्थसंकट

कोरोनामुळे 100 वर्षांतील सर्वात मोठे अर्थसंकट
RBI governor

मुंबई

कोरोना विषाणूचे संकट हे 100 वर्षांतील सर्वांत मोठे आरोग्य आणि आर्थिक संकट आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट आणि नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. कोरोनामुळे जगभरातील सध्याची जागतिक व्यवस्था, रोजगार आणि गुंतवणूक कोलमडून गेली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढत गती देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी शनिवारी दिली. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित सातव्या एसबीआय बॅंकिंग ऍण्ड इकॉनॉमिक्‍स या परिषदेत संबोधित करत होते.
भारतीय अर्थव्यवस्थेने टाळेबंदीचे निर्बंध शिथिल केल्यानंतर हळूहळू पूर्वपदावर येण्याचे संकेत दिले आहे. वित्तीय क्षेत्राने कोणत्याही सवलतीवर अवलंबून न राहता कामकाज पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावेत. कोरोना महामारीच्या संकटात सुरुवातीलाच रिझर्व्ह बॅंकेच्या बहुआयामी आणि प्रगल्भ दृष्टिकोनामुळे बॅंकांवर होणारा परिणाम कमी होण्यास मदत झाली आहे; परंतु सध्या कोरोनाचे वाढणारे संकट पाहता आरबीआयला अतिशय काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील. केवळ पतपुरवठा न करता अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी बफर तयार करणे भांडवल उभारणी करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे ते म्हणाले.
लॉकडाऊन आणि लॉकडाऊन नंतरच्या संभाव्य आर्थिक परिणामांमुळे नॉन परफॉर्मिंग मालमत्ता आणि बॅंकांचे भांडवल कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बॅंकांसाठी पुनरुज्जीवन योजना आवश्‍यक झाली आहे, असे ते म्हणाले.

बॅंकांकडून कारभारात सुधारणा आवश्‍यक
देशाची बॅंकिंग आणि वित्तीय व्यवस्था अर्थव्यवस्था सुधारण्यास सक्षम असल्याच्या मुद्यांवर त्यांनी जोर दिला. या आव्हानात्मक काळात बॅंकांना त्यांच्या कारभारात सुधारणा करावी लागेल, तसेच जोखीम व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. बॅंकांनीही परिस्थिती सुरळीत होण्याची वाट न पाहता भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करावे लागतली, असे त्यांनी सांगितले.

संपादन- अवित बगळे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com