बॅंक ऑफ इंडियाची 57 कोटींची फसवणूक?

Dainik Gomantak
गुरुवार, 18 जून 2020

भाजप नेते मोहित कंबोज यांच्यासह चौघांवर गुन्हा

मुंबई

बॅंक ऑफ इंडियाची 57 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज व अन्य तिघांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबईत पाच ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. दरम्यान, कंबोज यांनी आरोप फेटाळून लावत "वन टाईम सेटलमेंट'अंतर्गत 2018 मध्ये 30 कोटी रुपये भरल्याचे सांगितले.
बॅंक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून सीबीआयने मे. अव्यान ओव्हरसीज प्रा. लि. (सध्याची बाग्ला ओव्हरसीज प्रा. लि.) व या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज, जितेंद्र गुलशन कपूर, सिद्धांत बाग्ला, इर्तेश मिश्रा (चौघेही संचालक) व केबीजे हॉटेल्स गोवा प्रा. लि. यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2013 ते 2018 या काळात फोर्ट येथील बॅंक ऑफ इंडियाच्या मिड कॉर्पोरेट शाखेत ही फसवणूक झाली. या प्रकरणी काही बॅंक अधिकाऱ्यांवरही संशय आहे.
आरोपींनी कट रचून फॉरेन बिल्स निगोसिएशन, एक्‍सपोर्ट पॅकेजिंग क्रेडिट लिमिट या नावाखाली 60 कोटींचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. या पैशांचा वापर अन्य कामांसाठी करण्यात आला. त्यामुळे बॅंक ऑफ इंडियाचे 57 कोटी 26 लाख रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईत आरोपींची घरे, कार्यालय व खासगी कंपनी अशी पाच ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईत मालमत्ता, कर्ज, बॅंक खात्याची माहिती व लॉकरच्या चाव्या असे साहित्य हस्तगत करण्यात आले. अधिक तपास सुरू असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

"एकरकमी तडजोडीत 30 कोटी भरले'
मोहित कंबोज यांनी हा आरोप फेटाळला असून, 2018 मध्ये एकरकमी तडजोडीत 30 कोटी रुपये भरल्याचा दावा केला. बॅंक ऑफ इंडियाने मार्च 2019 मध्ये "नो ड्यूज' प्रमाणपत्रही दिले होते. त्यामुळे कर्जाची रक्कम फेडल्यानंतर अडीच वर्षांनी बॅंकेने तक्रार का केली, हे समजत नसल्याचे ते म्हणाले. बॅंकेकडून चूक झाली आहे; तरी मी सीबीआयच्या तपासात सहकार्य करत आहे. सीबीआयवर पूर्ण विश्‍वास आहे, असेही कंबोज यांनी सांगितले.

संबंधित बातम्या