कोरोनाकाळात नवीन घर विकत घेण्याची कोणाला संधी?

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

गेल्या 15 वर्षात पहिल्यांदाच घर विकत घेऊ पाहणाऱ्यांचा वरचष्मा असणार आहे. बिल्डरच्या नियमांनुसार न चालता तुम्हाला वाटाघाटी करण्याची ताकद मिळणार आहे. तुम्ही ठरवल्यापेक्षा कमी किमतीत तुम्हाला घर मिळू शकते.

नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे घरांच्या किंमती आणि व्याज दर कमी झाले आहेत. त्यामुळे घर घेणे किंवा सध्या असलेल्या घरापेक्षा मोठे घर घेण्याचा विचार तुमच्या डोक्यात येऊ शकतो. मात्र, घर विकत घेण्याचा निर्णय हा विचारपूर्वक घेतलेला असावा. कारण कोरोना महामारीमुळे घराच्या किंमती या काही काळासाठी कमीच राहणार आहेत. आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की, कोरोनामुळे मंदी निर्माण झाली आहे. त्यामुळे तुमच्या हातात वाहता पैसा राहणे महत्वाचे आहे. जास्तीचा खर्च करुन तुम्ही अधिकची जबाबदारी शिरावर घेणे योग्य ठरणार नाही.

घर विकत घ्यायचं की भाड्याने राहायचं?

ज्यांची नोकरी आणि वेतन स्थिर आहे आणि जे खूप काळापासून घर घेण्याचा विचार करत आहेत. अशांसाठी ही वेळ सर्वोत्तम आहे. खूप काळापासून घर विकत घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. गेल्या 15 वर्षात पहिल्यांदाच घर विकत घेऊ पाहणाऱ्यांचा वरचष्मा असणार आहे. बिल्डरच्या नियमांनुसार न चालता तुम्हाला वाटाघाटी करण्याची ताकद मिळणार आहे. तुम्ही ठरवल्यापेक्षा कमी किमतीत तुम्हाला घर मिळू शकते.

महामारीमुळे ज्यांना आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे. तसेच ज्यांच्या नोकरीबाबत निश्चितता नाही, त्यांनी भाड्याच्या घरात राहणेच चांगले राहिल. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडला आहे. अशा परिस्थितीत कोणतीही आर्थिक जोखीम न घेता भाड्याच्या घरातच राहणे सोयीस्कर ठरेल. शिवाय भाड्याच्या घरांच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. 

विकत किंवा भाड्याने कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल?

नवीन घर घेऊ शकतात अशा लोकांनीही काही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. मोक्याच्या जागी असलेल्या घराच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. शिवाय पुढील एक-दोन वर्ष तरी या किंमती कमीच राहण्याची शक्यता आहे. तुम्ही एखादे घर विकत घेतले आणि ते एकाद्याला भाडेतत्वावर दिले तर तुम्हाला नुकसान सहन करावा लागू शकते. कारण घराचे भाडे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे तुम्ही घरासाठी जेवढा ईएमआय भरताय त्यापेक्षा कमी उत्पन्न तुम्हाला भाड्यातून मिळेल. शिवाय तुम्ही सध्या भाड्याच्या घरातच राहणे फायद्याचे आहे. कारण पुढील काही वर्षे तरी तुम्हाला कमी भाडे द्यावे लागणार आहे किंवा तुमचे भाडे वाढणार नाही.

संबंधित बातम्या