केंद्र सरकारचा मोठा निर्णय; विमान प्रवास महागणार

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; विमान प्रवास महागणार
Copy of Gomantak Banner - 2021-02-11T224241.473.jpg

केंद्र सरकारने अंतर्गत विमान प्रवासासाठीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकराने देशांतर्गत विमान प्रवासासाठीच्या किमान आणि कमाल भाड्यातील दरामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने आज नवीन मर्यादा भाडेवाढ 31 मार्चपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असल्याचे म्हटले आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील 40 मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या विमानाच्या प्रवासासाठी 2,200 रुपये मोजावे लागणार आहे. यापूर्वी ते 2,000 रुपये होते. तसेच विमान कंपन्या जास्तीत जास्त  7,800 रुपये भाडे आकारू शकणार आहेत. जे याअगोदर 6,000 रुपये होते. त्याचबरोबर देशातील विमान प्रवासात 80 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार नसल्याचे नागरी उड्डयन मंत्रालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.  

सरकारने लागू केलेल्या नव्या आदेशामुळे, देशातील 40 ते 60 मिनिटांच्या प्रवास कालावधीसाठी आता कमीतकमी 2,800 रुपये आणि जास्तीत जास्त 9,800 रुपये द्यावे लागणार आहे. पूर्वी ही मर्यादा 2,500 ते 7,500 रुपये होती. त्यानंतर एक तास किंवा त्याहून अधिक दीड तासांच्या प्रवासासाठी 3,300 ते 11,700 रुपये खर्च करावा लागणार आहे. आणि दीड तासाच्या पेक्षा जास्त व दोन तासापेक्षा कमी कालावधीसाठीच्या प्रवासाला कमीतकमी 3,900  रुपये आणि जास्तीत जास्त 13,000 रुपये विमान कंपन्या वसूल करू शकणार आहेत. यापुढे दोन तास आणि अडीच तासाच्या प्रवासावर 5,000 ते 16,900 रुपये नवीन भाडे मर्यादा राहणार आहे. याशिवाय अडीच तासाहून जास्त आणि तीन तासाच्या प्रवासावर किमान भाडे 6,100 व कमाल 20,400 रुपये कंपन्यांना आकारता येणार आहे. तर तीन तासाहून अधिक आणि साडे तीन तासापेक्षा कमी कालावधीच्या प्रवासावर 7,200 ते 24,200 ही नवीन भाडे मर्यादा राहणार आहे. 

यापूर्वी, देशातील प्रवासासाठी अधिक भाडे 18,600 रुपये होते. कोरोनाच्या काळानंतर म्हणजेच मागील वर्षाच्या 21 मे ला देशांतर्गत विमान प्रवास सुरु करताना नागरिक विमान महानिर्देशनालयाने (डीजीसीए) प्रवासामध्ये संपूर्ण क्षमतेच्या 33 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवाशांना बंदी घातली होती. त्यानंतर जून मध्ये ही मर्यादा वाढवून 45 टक्क्यांवर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर हळूहळू ही मर्यादा 80 टक्क्यांवर नेण्यात आली होती. 

दरम्यान, सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे जानेवारीच्या अखेरीस म्हटले होते. कोरोना विषाणूची नवी स्ट्रेन आणि युरोपियन देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारणांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे डीजीसीए आपल्या आदेशात म्हटले होते. तर वंदे भारत मिशन अंतर्गत होत असलेली आंतराष्ट्रीय उड्डाणे मर्यादित स्वरूपात चालूच राहणार असल्याची माहिती डीजीसीए दिली होती.         

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com