Share Market : सेन्सेक्स 51 हजारच्या खाली; निफ्टीने देखील सोडली 15 हजारची पातळी   

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

देशातील भांडवली बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी आज पुन्हा मोठी घसरण नोंदवली आहे.

देशातील भांडवली बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी आज पुन्हा मोठी घसरण नोंदवली आहे. आठवड्याच्या पाचव्या सत्रात तर सलग चौथ्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने घसरणीची नोंद केली आहे. देशातील सर्वात जुन्या मुंबई शेअर बाजाराने आज 51 हजारची पातळी सोडली. आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 15 हजारच्या खाली आला. मुंबई शेअर बाजाराचा बीएसई निर्देशांक आज 434.93 अंकांनी खाली येत 50,889.76 वर बंद झाला. व राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निर्देशांक 137.20 ने घसरत 14,981.75 वर स्थिरावला.         

आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोमवारी भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी मोठी उसळी नोंदवली होती. परंतू त्यानंतर बाहेरील गुंतवणूकदारांसह देशातील गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा पर्याय स्वीकारला होता. आणि त्यामुळे आठवड्याच्या दुसऱ्या सत्रापासून भांडवली बाजाराने घसरण नोंदवण्यास सुरवात केल्याचे पाहायला मिळत आहे. पहिले सत्र सोडल्यास मागील चार सत्रांपासून मुंबई शेअर बाजाराचा एनएसई जवळपास 1200 अंकांनी खाली घसरला आहे. तर, निफ्टी देखील 300 अंकांहून अधिक खाली आलेला आहे.    

आज शेअर बाजारातील सेन्सेक्स मधील ओएनजीसीच्या समभागांमध्ये सर्वाधिक 5.06 टक्क्यांची घसरण झाली. एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो, मारुती, पॉवरग्रीड, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट, भारती एअरटेल, आयटीसी, सन फार्मा, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, टायटन, एचडीएफसी , कोटक महिंद्रा बँक आणि इन्फोसिसचे समभाग देखील घसरणीसह बंद झाले. तर, इंडसइंड बँकेच्या समभागात सर्वाधिक 1.97 टक्क्यांची वाढ झाली. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, डॉ. रेड्डीज, एनटीपीसी, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एचसीएल टेक आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स वधारले. 

 

संबंधित बातम्या