आता सोने आणि चांदी घेणं झालं स्वस्त!

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

सध्या सोन्याच्या किंमती जवळपास साडेपाच हजारांनी कमी होऊन 50 हजार 584 पर्यंत आल्या आहेत. तर चांदीच्या दरात 18 हजारांपेक्षा जास्त रुपयांनी कमी होऊन प्रति किलो 61 हजार 250 रुपये झाले आहे. 

नवी दिल्ली: मागील 2 महिन्यांपासून सोन्यासह इतर मौल्यवान धातूंच्या किंमती विक्रमी वाढल्याचे दिसले होते. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅमला 56 हजार 200 पर्यंत गेल्या होत्या. तर चांदीही प्रति किलो 80 हजारांपर्यंत गेली होती. सध्या सोन्याच्या किंमती जवळपास साडेपाच हजारांनी कमी होऊन 50 हजार 584 पर्यंत आल्या आहेत. तर चांदीच्या दरात 18 हजारांपेक्षा जास्त रुपयांनी कमी होऊन प्रति किलो 61 हजार 250 रुपये झाले आहे. 

 सोने आज पुन्हा स्वस्त झाले -

परदेशी बाजारपेठेतील ट्रेंडमुळे मंगळवारी देशांतर्गत बाजारात सोने-चांदीचे भाव पुन्हा घसरले. कमॉडिटी एक्स्चेंज एमसीएक्सवर डिसेंबर डिलिव्हरीचे सोने 0.2 टक्क्यांनी घसरून 50 हजार 584 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आले, तर चांदीचे वायदे 0.35 टक्क्यांनी घसरून 61 हजार 882 रुपये प्रति किलो झाले आहे. मागील सत्रात सोन्याचे भाव 0.24 टक्क्यांनी तर चांदी 0.6 टक्क्यांनी वाढले होते

 

सोन्याच्या दरात का होत आहे घसरण?

जागतिक पातळीवर डॉलर मजबूत झाल्याने आणि अमेरिकेच्या प्रोत्साहन पॅकेजच्या वाटाघाटींमुळे सोन्याचे भाव घसरताना दिसत आहेत. जागतिक बाजारपेठेत स्पॉट सोने 0.1 टक्क्यांनी घसरून 1898.16 डॉलर प्रति औंस वर गेले आहे. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.3 टक्क्यांनी घसरून 24.43 डॉलर प्रति औंस झालंय. 

दिवाळीनंतर वाढू शकतात सोन्याचे दर -

दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढू शकतात असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठू शकते. दिवाळीनंतर सोने प्रति १० ग्रॅमला 53 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या