देशभरातील डिजिटल पेमेंटचे प्रमाण पूर्वपदावर

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

लॉकडाउनमुळे देशभरातील डिजिटल पेमेंटचे प्रमाण ६० टक्क्यांनी कमी झाले होते.

मुंबई

कोरोनाच्या प्रादुर्भावावर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशभरातील उद्योगधंद्यांना उतरती कळा लागल्यानंतर जारी करण्यात आलेल्या अनलॉकमुळे देशभरातील डिजिटल पेमेंटचे प्रमाण पूर्वपदावर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लॉकडाउनमुळे देशभरातील डिजिटल पेमेंटचे प्रमाण ६० टक्क्यांनी कमी झाले होते. यासंदर्भात मंगळवारी आरबीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (एनपीसीआय)द्वारे संचालित यूपीआयवरून अनलॉकनंतर २८ जूनपर्यंत देशभरात १.४२ अब्ज व्यवहारांमधून २.३१ लाख कोटी रुपयांचे डिजिटल पेमेंट करण्यात आले आहे. या व्यासपीठावर एका महिन्यात झालेला हा सर्वाधिक मोठा व्यवहार असल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी नमूद केले आहे. याआधी एप्रिल २०२० मध्ये देशभरात या व्यासपीठावरिल ९९ करोड व्यवहारांमधून १.५ लाख करोड रुपयांचे डिजिटल पेमेंट करण्यात आले आहे.

काय आहे वाढीमागचे कारण?
डिजिटल पेमेंटमध्ये झालेल्या वाढीचे कारण म्हणजे अधिकाधिक ग्राहक कॉन्टॅक्टलेस माध्यमांद्वारे खरेदी करीत असून, फोन अथवा कार्डच्या माध्यमातून बिल भरत आहेत आणि खरेदी करीत असल्याचे मत तज्ज्ञांनी या वेळी व्यक्त केले.

कार्ड पेमेंटमध्येही मोठी वाढ
डिजिटल पेमेंटच्या सोबतच कार्डद्वारे पेमेंट करण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांमध्ये वाढले असून, कोरोनापूर्वी केल्या जाणाऱ्या व्यवहारांमध्ये ७० ते ८० टक्के वाढ झाल्याची माहिती अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा, आरबीएल बँक आणि एसबीआय कार्डच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

लॉकडाउन आणि अनलॉकच्या कालावधीत रोख व्यवहार करण्यापेक्षा डिजिटल माध्यमातून व्यवहार करण्यावर ग्राहकांनी भर दिलेला आहे. तसेच, आधीच्या तुलनेत ओनलाइन रिचार्ज करण्याच्या प्रमाणात १८० टक्के वाढ झाली आहे.
- अंबरीश केंघे, वरिष्ठ संचालक, उत्पादन विभाग, गुगल पे

संबंधित बातम्या