मिलग्रोम,विल्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

१९६९ ते २०१९ या कालावधीत आतापर्यंत ५१ वेळा हा पुरस्कार जाहीर झाला असून ८४ जणांना तो वितरित करण्यात आला आहे.  

स्टॉकहोम- अर्थशास्त्राची एक शाखा असलेल्या लिलाव सिद्धांतामध्ये मोलाची भर टाकल्याबद्दल आणि लिलावाच्या नव्या पद्धती शोधल्याबद्दल पॉल आर. मिलग्रोम आणि रॉबर्ट बी. विल्सन या अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे. रॉयल स्विडीश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस गोरान हॅन्सन यांनी आज हा पुरस्कार जाहीर केला. 

सर आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ १९६९ पासून अर्थशास्त्रातील संशोधनासाठी ‘स्वेरिएस रिक्सबँक पुरस्कार’ दिला जातो. हाच पुरस्कार नोबेल पुरस्कारांमध्ये गणला जातो. दहा लाख क्रोना (११ लाख डॉलर) आणि सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. रॉबर्ट विल्सन आणि पॉल मिलग्रोम यांनी लिलाव सिद्धांताचा आणि पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्यात सुधारणा सुचविल्या आणि प्रत्यक्ष अमलातही आणल्या. यामुळे समाजाला मोठा फायदा झाला, असे पुरस्कार समितीचे प्रमुख पीटर फ्रेडरिक्सन यांनी म्हटले आहे. लिलाव प्रक्रिया कशी चालते, खरेदीदार विशिष्ट पद्धतीनेच कसे वागतात? या स्पष्ट करण्याबरोबरच या दोन्ही विजेत्यांनी त्यांच्या संशोधनाचा उपयोग करून वस्तू आणि सेवांच्या लिलावासाठी नवीन प्रक्रियाही विकसीत केली. 

अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाल्याने यंदाचे सर्व नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत. गेल्या वर्षी जागतिक स्तरावरील गरीबी कमी करण्यासाठी केलेल्या संशोधनाबद्दल ‘एमआयटी’मधील दोघांना आणि हार्वर्ड विद्यापीठातील एकाला अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. १९६९ ते २०१९ या कालावधीत आतापर्यंत ५१ वेळा हा पुरस्कार जाहीर झाला असून ८४ जणांना तो वितरित करण्यात आला आहे.  

काय केले संशोधन?

एखादी कंपनी अथवा व्यक्ती निवीदा दाखल करताना सर्वसामान्य किमतीपेक्षा कमी किमतीची निवीदा का सादर करते, याचा अभ्यास विल्सन यांनी केला. खूप मोठी बोली लावून अधिक पैसे गमावण्याची भीती त्यांना असते, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

संबंधित बातम्या