अर्थविश्‍व

Dr. Manoj Kamat
सोमवार, 27 जुलै 2020

वॉलमार्ट या जागतिक किरकोळ व्यापार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कंपनीने २०१८ साली तब्बल १६ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतलेल्या भारतातील फ्लिपकार्ट या भारतीय आस्थापनाने उलट अधिग्रहण (संपादन) व्यवहारातून ‘वॉलमार्ट इंडिया’ हि कंपनी विकत घेणार असल्याचे घोषित करून संघटित किरकोळ व्यापार क्षेत्रात एक मैलाचा दगड पार केला आहे.

संघटीत किरकोळ, घाऊक क्षेत्राचे सबलीकरण

वॉलमार्ट या जागतिक किरकोळ व्यापार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कंपनीने २०१८ साली तब्बल १६ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतलेल्या भारतातील फ्लिपकार्ट या भारतीय आस्थापनाने उलट अधिग्रहण (संपादन) व्यवहारातून ‘वॉलमार्ट इंडिया’ हि कंपनी विकत घेणार असल्याचे घोषित करून संघटित किरकोळ व्यापार क्षेत्रात एक मैलाचा दगड पार केला आहे.

‘फ्लिपकार्ट होलसेल’ या नावाने येत्या ऑगस्टपासून किराणा व फॅशन विभागांसह आता घाऊक बाजारपेठेत फ्लिपकार्ट उतरणार असून, वॉलमार्ट इंडियाच्या ताब्यातील २८ घाऊक स्टोअर्स, १ दशलक्ष सदस्य संख्या, ५००० वस्तूंचा व्यवहार व लखनऊ व हैदराबादमधील दोन मोठी पूर्तता केंद्र आपल्या कवेत घेणार असून, भारतातील संघटित घाऊक बाजारपेठेने आपले पाय रोवण्यासाठी आता सज्ज ठरणार आहे.

फ्लिपकार्टची भरारी
बंगळूर कर्नाटक येथे संजय बन्सल यांनी साल २००७ मध्ये फ्लिपकार्ट हे आस्थापन सुरू करून सर्वप्रथम आॅनलाईन पुस्तक विक्रीवर लक्ष केंद्रीत केले होते. ऑनलाईन विक्री अध्यायाची भारतातील मुहूर्तमेढ त्यावेळी रोवली गेली, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. पुढील काळात फ्लिपकार्टने इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, घरगुती वस्तू, किराणा सामान आणि जीवनशैली उत्पादन वितरण श्रेणींमध्ये आपला कार्यभार विस्तारित केला असून, भारतीयांना ऑनलाईन खरेदी करणे शिकविले असे म्हणता येईल. फ्लिपकार्ट भारतात ॲमेझॉन या अमेरिकास्थित कंपनीची भारतातील सहाय्यक कंपनी ॲमेझॉन इंडिया आणि श्री. कुणाल बहल व रोहित बन्सल या द्वयींनी दिल्ली येथे साल २०१० मध्ये स्थापन केलेल्या ‘स्नॅपडिल’ या कंपनीशी स्पर्धा करते. ‘मिंत्रा’ ही ऑनलाईन किरकोळ विक्रेती कंपनी आपल्या ताब्यात घेतल्यानंतर परिधान वस्त्रांच्या विक्रीत महत्त्वपूर्ण बाजारपेठेवर कब्जा मिळविला असून, इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल फोनच्या विक्रीमध्ये ॲमेझॉनशी स्पर्धा करते. सध्या फ्लिपकार्टकडे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) वर आधारित ‘फोनपे’ या ऑनलाईन पेमेंट (डिजीटल आर्थिक व्यवहार) कंपनीचीही मालक असून, ऑनलाईन व्यवहार क्षेत्रात या कंपनीने आपले पाय घट्ट रोवले आहेत.

‘फ्लिपकार्ट होलसेल’ ः नवा अध्याय
‘फ्लिपकार्ट होलसेल’ या आपल्या नव्या व्यवसायाची सुरूवात फ्लिपकार्टकडून येत्या महिन्यापासून होणार आहे. घाऊक व्यवहार क्षेत्रात दर्जेदार वस्तू कमीतकमी किंमतीत देणाऱ्या वॉलमार्ट इंडियामधील १०० टक्के व्यवहार हाती घेतल्यानंतर किराणा आणि फॅशन प्रकारांपासून सुरूवात करण्यात येईल. नव्या व्यवहाराचा उद्देश देशातील घाऊक परिसंस्था वढविण्याचा असून, लघुउद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देणे हे प्रमुख ध्येय आहे. परिपूर्ण गोदामे, सक्षम पुरवठा साखळी व प्रशिक्षित अनुभवी मनुष्यबळ या सारख्या आच्छादित स्त्रोतांमुळे नव्या व्यवहाराची सुनिश्‍चितता प्रबळ करण्याकउे फ्लिपकार्टचे लक्ष असून देशातील तब्बल २० कोटींची नोंदणीकृत ग्राहक संख्या, ८० वेगवेगळ्या विभागांमधील तब्बल १५ कोटी उत्पादने हाताळण्याचा फ्लिपकार्टचा अनुभव असून, घाऊक पुरवठा क्षेत्रातील वॉलमार्टचा १२ वर्षांचा अनुभव, १.२ दशलक्ष सदस्यांना सेवा देण्याचा व लघुउद्योग आस्थापनांकडे असलेला दाट संपर्क फ्लिपकार्टच्या पथ्थ्यावर पडणार आहे.
वॉलमार्टने मागील दशकभरात तयार केलेल्या अफाट ग्राहक संबंध, व्यावसायिक लागेबंध यांच्या अनुभवावर बेतून फ्लिपकार्ट आता किराणा व्यवसायाबरोबरीनेच आता घाऊक व्यापार क्षेत्रात ‘जिओमार्ट’ या रिलायन्स कंपनीच्या उद्योगाबरोबरच ‘ॲमेझॉन इंडिया’ या बड्या उद्योगाशी आगामी स्पर्धात्मक लढाईसाठी स्वतःला सक्षम केले आहे.
फ्लिपकार्ट समूहाची सद्य पुरवठा साखळी व पायाभूत सुविधा नवीन किराणा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वापरली जाईल. यासाठी देशातील उच्च दर्जाचे ब्रँड, उत्पादक व विक्रेत्यांशी भागिदारी करण्यात येणार आहे. घाऊक बजारात पदार्पण केल्यानंतर देशातील छोट्या व्यावसायिकांना व साखळीतील लघुउद्योजकांना तंत्रज्ञान, दळणवळण व वित्तपुरवठा करून त्यांची व्यवसाय प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी फ्लिपकार्टची योजना आहे.
आपल्या संपर्कात येणाऱ्या व व्यापार भागिदारी करण्यात इच्छूक असणाऱ्या असंख्य विक्रेत्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी देशातील १० हून अधिक वित्तीय सहाय्य कंपन्यांकडे वित्तीय सहाय्य पुरविण्यासाठी भागिदारी केली आहे.

ऑनलाईन किरकोळ क्षेत्राचे सबलीकरण
‘रेडसीर’ या जागतिक सल्लागार कंपनीच्या एका अहवालानुसार, भारतीय किरकोळ क्षेत्राची उलाढाल वर्ष २०२५ पर्यंत डॉलर १.३ अब्जपर्यंत होऊन वार्षिक सहा टक्के अशा चक्रीदराने वाढ होत राहील. फ्लिपकार्टच्या नव्या व्यवहार संपादनामुळे किरकोळ व्यापार क्षेत्राला नवी चालना मिळेल. सध्या या क्षेत्रात जिओमार्ट, उडान व ॲमेझॉन या कंपनीमध्ये तीव्र स्पर्धा आहे. बाजापेठेचा जास्तीतजास्त हिस्सा आपल्याला मिळावा यासाठी या कंपन्यांमध्ये नवीन अधिग्रहण करण्याबाबत चुरसही तितकीच औत्सुक्यतापूर्ण आहे. ॲमेझॉन इंडियाने रिलायन्स रिटेलमध्ये भागभांडवल खरेदी करण्याची तयारी दाखवत असतानाच रिलायन्सकडून फ्युचर ग्रुपचा किरकोळ व्यवसाय ताब्यात घेण्याबाबत चर्चा रंगत आहे. दुसरीकडे ॲमेझॉन देखील फ्युचर ग्रुपकडे संधान बांधण्याबाबत चर्चा होत असताना मुकेश अंबानी यांनी अलीकडेच जीओमार्ट आता २०० शहरांमध्ये व्यवसाय उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा उल्लेख केला. आपण वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानात सुधारणा केल्यानंतर दिवसाडोई २५०,००० ऑर्डर्स मिळत असल्याचा जिओमार्टचा दावा आहे. आपल्या तंत्रज्ञान बळाच्या जोरावर इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग, फॅशन, औषधे व स्वास्थ्य संबंधी वस्तुंकडे मोर्चा वळविण्याचा जिओमार्टचा संकल्प असून, त्यादृष्टीने कंपनीने जोरदार प्रयत्न चालविले आहेत.
वॉलमार्ट इंडियाने मागील दशकभराच्या व्यवसायाअंती अगदी गेल्या वर्षापर्यंत तब्बल २१८१ कोटी रुपयांचे नुकसान नोंदविलेले आहे. २०१९ च्या आर्थिक वर्षात या कंपनीने ४०९५ कोटी रुपयांचा व्यवसाय करून १७२ कोटी रुपयांचे नुकसान सोसले होते. तीव्र स्पर्धा, कमी उत्पन्न, वाढता खर्च व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणारी मोठमोठी गुंतवणूक यामुळे खर्च कपात व उत्पन्न स्त्रोत वाढविणे या पर्यायांकउे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते. त्यासाठी बाजारपेठेवर आपले नियंत्रण असल्याखेरीज या धंद्यात टिकून राहणे शक्य नाही. अन्य स्पर्धात्मक कंपन्यांचे अधिग्रहण करणे मग त्यासाठी एक सुलभ मार्ग ठरतो. अशा अधिग्रहणांमुळे खर्चाची उत्पादकता वाढविण्याचा फायदा होतो, पण अधिक प्रमाणात भांडवल ओतण्याची तयारी लागते. फ्लिपकार्टने वॉलमार्ट इंडियाच्या अधिग्रहणानंतर १.२ अब्ज डॉलर्स व्यवसायामध्ये गुंतविण्याची तयारी ठेवली आहे.
‘रेडसीर’या सल्लागार कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे, देशातील किरकोळ क्षेत्र ६ टक्के वार्षिक दराने वाढत असले तरीही, तज्ज्ञांच्या मते ऑनलाईन किरकोळ व्यापार क्षेत्राची वाढ वार्षिक २७ टक्के दराने घेण्याची अपेक्षा आहे. कित्येक कोटींचा तोटा सोसून ऑनलाईन व्यापार कंपन्या या भविष्यातील आशेने सध्या तोटा सहन करत मार्गक्रमण करीत आहेत, यामुळेच किराणा, फॅशन व इलेक्ट्रॉनिक्स उद्योग वरील वाढीचे प्रमुख तारक असणार आहेत. आजवर आॅनलाईन व्यापाराने देशातील पाच टक्के लोकसंख्येकडेसुद्धा संधान बांधलेले नाही. यावरून या क्षेत्राच्या भावी व्याप्तीची कल्पना करता यावी. २०२४ सालापर्यंत ही व्याप्ती दहा टक्क्यांची होईल. भविष्यकालीन अपेक्षित वाढीच्या आशेने आज संघटीत किरकोळ व ऑनलाईन व्यापार क्षेत्रात अधिग्रहणांची साथ सुरू झाली असून, फ्लिपकार्ट, वॉलमार्टच्या एकत्रिकरणामुळे व्यापार स्पर्धा अतितीव्र बनण्यास सुरूवात झाली आहे.
कोरोना संक्रमण काळात खऱ्या अर्थाने ऑनलाईन व्यापाराला चांगले दिवस येत असून, आगामी काळात फ्लिपकार्ट, जिओमार्ट, उडान, ॲमेझाॅन, फ्युचर्स ग्रुप यांच्यामध्ये अधिग्रहण, एकत्रीकरण व सबलीकरणाची खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. व्यवसाय कार्यक्षमता वाढविण्यासाठी व स्पर्धेत टिकाव धरून राहण्यासाठी तोच एकमेव राजमार्ग किरकोळ व्यापार क्षेत्राकउे सध्या आहे.

संबंधित बातम्या