येणाऱ्या अर्थसंकल्पासाठी देशाला तुमच्या सूचना हव्या आहेत; कशी द्याल सूचना? वाचा..

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

येत्या आर्थिक वर्षात(2021-22)देशातील कोणत्याही नागरिकाला आपल्या कल्पना किंवा सूचना पाठवून अर्थसंकल्पात सहभागी होता येईल.

नवी दिल्ली- पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होईल. या अर्थसंकल्पाच्या वेळेस एक खास गोष्ट असणार आहे. याचं कारण असं की यावेळी सामान्यातील सामान्य माणसालाही देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी आपलं योगदान देता येणार आहे. केंद्र सरकार यासाठी जनतेकडून अर्थसंकल्पासाठी सूचना मागवत असून ज्या नागरिकांना यात आपलं योगदान द्यायचं असेल ते यात सहभागी होऊ शकणार आहेत. 

येत्या आर्थिक वर्षात(2021-22)देशातील कोणत्याही नागरिकाला आपल्या कल्पना किंवा सूचना पाठवून अर्थसंकल्पात सहभागी होता येईल. अशा प्रकारची कल्पना किंवा सूचना पाठवण्यासाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता ती 7 डिसेंबर 2020 अशी करण्यात आली आहे.  

2021-22 च्या अर्थसंकल्पात लोकांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा यासाठी सरकारने MyGov प्लॅटफॉर्मची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्हाला बजेटसाठी काही सूचना करायच्या असतील तर यासाठी ऑनलाईन संपर्क साधावा लागेल. अर्थसंकल्पात अधिकाधिक सामान्य लोकांचा समावेश करण्यावर सरकारचा भर आहे. सामान्य जनतेच्या वतीने MyGov वर सूचना सादर केल्यानंतर भारत सरकारची संबंधित मंत्रालये किंवा विभागांकडून त्या सूचनांची किंवा कल्पनांची तपासणी केली जाणार आहे.

कशी करता येईल सूचना?
तुम्हाला अर्थसंकल्प 2021 साठी सूचना देण्यासाठी  https://www.mygov.in/mygov-survey/inviting-suggestions-budget-2021-22/ या वेबसाइटवर जावं लागणार आहे. याठिकाणी गेल्यावर कमेंट बॉक्समध्ये सूचना सादर करता येणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला आधी ईमेल आयडी किंवा मोबाइल क्रमांकासह लॉग इन करणे आवश्यक आहे. तुमच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल नंतर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकाल आणि तूमच्या सूचना सरकारला कळवू शकाल. तुम्हाला फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन या सोशल मीडिया अकाउंट्सवरून लॉग इन करू शकतात.

संबंधित बातम्या