देशातील आर्थिक व्यवहारांना तडाखा
money

देशातील आर्थिक व्यवहारांना तडाखा

मुंबई

कोरोनाच्या फैलावामुळे एप्रिलमध्ये टाळेबंदी जारी झाल्यावर सर्व क्षेत्रांना जोरदार तडाखा बसला. देशात विविध माध्यमांमधून होणारे आर्थिक व्यवहार तब्बल 70 टक्‍क्‍यांपर्यंत रोडावल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये धनादेश, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, एनईएफटी, आरटीजीएस आदी माध्यमांतून होणारे आर्थिक व्यवहार 26 ते 70 टक्के कमी झाले. या घटलेल्या व्यवहारांचे रुपयांमधील मूल्य 46 टक्के होते. केवळ आधारच्या माध्यमातून केंद्र सरकारने थेट लाभार्थींच्या बॅंक खात्यांत जमा केलेल्या रकमांच्या व्यवहारात मोठी म्हणजे 138 टक्के वाढ झाली आहे. शेतकरी अनुदाने, महिलांची अनुदाने आदींच्या या रकमा होत्या.
एनईएफटी व आरटीजीएस ही मोठ्या आणि वेगवान पेमेंटसाठी लोकप्रिय माध्यमे आहेत. त्याद्वारे देशातील 90 टक्के पेमेंट व्यवहार होतात. आरटीजीएसचे क्‍लिअरिंग सतत; तर एनईएफटीचे क्‍लिअरिंग दर अर्ध्या तासाने होते. मार्चमध्ये आरटीजीएस पद्धतीने 120 लाख कोटींचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी एप्रिलमध्ये हात आखडता घेतला. त्या महिन्यात फक्त 64 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. ही घट 46.5 टक्के होती. एप्रिलमध्ये एनईएफटी व्यवहारांमध्ये 42.7 टक्के घट झाली. मार्चमध्ये 22 लाख 83 हजार कोटींचे; तर एप्रिलमध्ये फक्त 13 लाख कोटींचे व्यवहार झाले.
आयएमपीएस माध्यमातून होणारे व्यवहार 40 टक्‍क्‍यांनी कमी (मार्चमध्ये दोन लाख कोटी; तर एप्रिलमध्ये सव्वा लाख कोटी) झाले. यूपीआय व्यवहारही 26.8 टक्‍क्‍यांनी घटले. दुकाने-मॉलमधील पीओएस मशीनमार्फत होणारे व्यवहार 69.7 टक्‍क्‍यांनी कमी झाले. खरेदीदारांनी मार्चमध्ये साडेसव्वीस हजार कोटी रुपयांचे; तर एप्रिलमध्ये जेमतेम 8000 कोटी रुपयांचे व्यवहार केले.

अनुदानांत मोठी वाढ
आधारच्या माध्यमातून केंद्र सरकारने लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा केलेली रक्कम मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये दुपटीपेक्षाही जास्त वाढली. मार्चमध्ये सुमारे 8000 कोटींची अनुदाने देणाऱ्या केंद्र सरकारने एप्रिलमध्ये जवळपास 19,000 कोटींची रक्कम लाभार्थींच्या बॅंक खात्यांत जमा केली. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत सरकारने अनुदान दिले; तर अडीच कोटी महिला जनधन खातेदारांना सरकारने तीन महिन्यांसाठी दरमहा 500 रुपये देण्याचे ठरवले. केंद्राच्या पावणेदोन लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून शेतकऱ्यांचा एप्रिलमध्ये 2000 रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला.

धनादेश, एटीएम व्यवहारांत सर्वाधिक घट
एरवी धनादेशाद्वारे दरमहा साडेपाच लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतात. मार्चमध्ये पाच लाख 65 हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाले. एप्रिलमध्ये धनादेशाद्वारे फक्त एक लाख 63 हजार कोटींचे व्यवहार झाले. म्हणजे या व्यवहारांमध्ये 71 टक्के घट झाली. एप्रिलमध्ये लोकांनी फक्त जीवनावश्‍यक बाबी व वैद्यकीय कारणांसाठीच खर्च केल्यामुळे एटीएम कार्डाद्वारे पैसे काढण्याचे व्यवहार 49 टक्‍क्‍यांनी घसरले. मार्चमध्ये एटीएममधून अडीच लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले; तर एप्रिलमध्ये फक्त सव्वा लाख कोटी रुपये काढले गेले.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com