"नाबार्ड'च्या अध्यक्षपदाचा पदभार  जी. आर. चिंताला यांनी स्वीकारला  

Dainik Gomantak
गुरुवार, 28 मे 2020

चिंताला हे बेंगळुरु येथील नाबार्ड मुख्यालयातील सहसंस्था "नॅबफिन्स'चे व्यवस्थापकीय संचालक होते.

मुंबई

केंद्र सरकारने नियुक्ती केलेले जी. आर. चिंताला यांनी बुधवारी (ता.27) नाबार्डच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. श्री. चिंताला हे बेंगळुरु येथील नाबार्ड मुख्यालयातील सहसंस्था "नॅबफिन्स'चे व्यवस्थापकीय संचालक होते. श्री. चिंताला हे नवी दिल्लीच्या भारतीय कृषि अनुसंधान संस्थानचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. "नाबार्ड'मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी नाबार्डच्या मुंबई मुख्य कार्यालयासह हैदराबाद, लखनऊ, चंदीगड, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, नवी दिल्ली आणि बेंगळुरु येथील प्रादेशिक कार्यालयांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. ते हैदराबादच्या ऍग्री बिझनेस फायनान्सचे दोन वर्ष उपाध्यक्ष आणि लखनऊच्या बॅंकर ग्रामीण विकास संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.
ग्रामविकास मंत्रालयाच्या स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये अनुसूचित जाती-जमातींच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यक्षमता या विषयावर श्री. चिंताला यांनी सल्लागार म्हणूनही काम केले. त्यांच्या शिफारशींमुळे देशात राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू होण्यासाठी मदत झाली. तसेच त्यांनी क्षेत्रीय पातळीवर काम केले असून त्यांच्या अनुभवाचा नाबार्डला कृषी आणि ग्रामीण विकासाच्या संदर्भात अधिक फायदा होईल. विशेषकरून सध्याच्या कोरोना महामारीच्या आव्हानाच्या काळात त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, असे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या