राज्य सरकार दोनशे कोटींचे कर्ज पुन्‍हा घेणार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

राज्य सरकारने २२ सप्टेंबर रोजी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज दहा वर्षे मुदतीच्या कर्जरोख्यांच्या माध्यमातून घेण्याचे ठरवले आहे. 

पणजी: राज्य सरकार पुन्हा दोनशे कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. यामुळे कर्ज रोख्यांच्या माध्यमातून या आर्थिक वर्षात घेतलेले राज्य सरकारचे कर्ज दीड हजार कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. राज्य सरकारने २२ सप्टेंबर रोजी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज दहा वर्षे मुदतीच्या कर्जरोख्यांच्या माध्यमातून घेण्याचे ठरवले आहे. 

या कर्जरोख्यांचा लिलाव रिझर्व बॅंक ऑफ इंडिया ऑनलाईन पद्धतीने करणार आहे. या कर्जाची परतफेड राज्य सरकार २३ सप्टेंबर २०३० रोजी करणार आहे. एका कर्जरोख्याचे दर्शनीमुल्‍य १० हजार रुपयांचे आहे. राज्य सरकारने एप्रिलमध्ये दोनशे, मे मध्ये तीनशे, जूनमध्ये दोनशे, १४ जुलै, २८ जुलै, ८ ऑगस्ट, १८ ऑगस्ट, २५ ऑगस्ट आणि ८ सप्टेंबर रोजी प्रत्येकी शंभर कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

संबंधित बातम्या