टाळंबेंदीत सराफी व्यवसाय संथ गतीत

dainik gomantak
मंगळवार, 19 मे 2020

गोव्याचा सराफी व्यवसाय पूर्णपणे मुंबईवर अवलंबून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सराफी व्यवसाय सध्या बंद आहे. त्यामुळे गोव्याच्या सराफी व्यवसायात सोन्याचा पुरवठा होत नाही.

मडगाव,

टाळेबंदीत निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर मडगावातील सराफी दुकाने सुरू करण्यात आली असली तरी सोन्याच्या दरात झालेली मोठी वाढ व मुंबईतून सोन्याचा पुरवठा होत नसल्याने सराफी व्यवसायावर परिणाम झाला आहे.
ग्राहकांकडून सराफी दुकनांवर सोने व दागिन्यासंबंधी चौकशी केली जाते. पण, व्यवसाय संथ गतीने सुरु आहे. दहा दिवसांपूर्वी सराफी दुकाने उघडण्यात आली. पण, व्यवसाय केवळ १५ टक्केच होत आहे, अशी माहिती गोवा गोल्ड डिलर असोसिएशनचे अध्यक्ष प्रमित रायकर यांनी दिली.
गोव्याचा सराफी व्यवसाय पूर्णपणे मुंबईवर अवलंबून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सराफी व्यवसाय सध्या बंद आहे. त्यामुळे गोव्याच्या सराफी व्यवसायात सोन्याचा पुरवठा होत नाही. सराफी व्यवसायिक जुन्या स्टॉकमधील सोन्याचा काही प्रमाणात वापर करत आहेत. तर टाळेबंदीत उत्पन्नाचे साधन नसल्याने काही जण सोन्याचे दागिने विकत आहेत, या सोन्याचा वापरही सध्या सराफी व्यवसायिक करत आहेत, अस रायकर यांनी सांगितले.
टाळेबंदीत सोन्याचा व्यवहार जवळपास बंदच राहिलेला असतानाही सोन्याचे भाव मात्र प्रचंड प्रमाणात वाढले. गेल्या दोन महिन्यांत १०० ग्रॅमच्या मागे तब्बल ७० हजार रुपयांची भाववाढ झाली. टाळेबंदी लागू करण्यापूर्वी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४२ हजार रुपये होता. आता सोन्याचा भाव ४९ हजारांच्यावर पोचला आहे. पुढील काही दिवसांत सोन्याचा भाव ५० हजारावर जाण्याची शक्यता आहे, असे रायकर यांनी सांगितले.
सोने व सोन्याच्या भाववाढीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांकडून संपर्क साधला जात आहे. पण, प्रत्यक्ष खऱेदी होत नाही, असे रायकर यांनी सांगितले.
एरवी हा हंगाम लग्नसराईचा असतो. पण, टाळेबंदीमुळे लग्नसमारंभ स्थगित करण्यात आले आहेत. लग्नसमारंभासाठी सोन्याच्या दागिन्यांची केलेली आगाऊ नोंदणी रद्द करण्यात आलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित बातम्या