सोने, हिऱ्यांची झळाळी लुप्त

Dainik Gomantak
गुरुवार, 18 जून 2020

दागिन्यांच्या निर्यातीत 90 टक्‍क्‍यांहून अधिक घट

मुंबई

रेड झोन असलेल्या मुंबईत हिरे व दागिने निर्यात करणाऱ्या कारखान्यांना सरकारने परवानगी दिल्यावर हा व्यवसाय हळूहळू का होईना सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल व मे महिन्यांपेक्षा या वर्षी व्यवसायात 90 टक्‍क्‍यांहून अधिक घट झाली असली, तरी वर्षभरात गती वाढण्याची उद्योजकांना अपेक्षा आहे. 
अंधेरीतील सीप्झमध्ये रत्न व आभूषणांचे किमान 150 कारखाने आहेत. तेथे फक्त निर्यातीसाठी सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने घडवले जातात. मुंबई रेड झोनमध्ये असल्याने तेथील बहुतेक कारखाने एप्रिलमध्ये बंदच होते. निर्यातीच्या ऑर्डर पूर्ण करायच्या असल्याने या व्यावसायिकांनी कारखाने उघडण्याची परवानगी मागितली. सरकारने 11 मे रोजी परवानगी दिल्यावर आधीच्या ऑर्डर पूर्ण करण्यात आल्या व नंतर नव्या ऑर्डरवरही काम सुरू झाले. 
एप्रिल-मे महिन्यांत सीप्झमधून सोने, चांदी व हिऱ्यांचे एकूण 4328 कोटी रुपयांचे दागिने निर्यात झाले. मागील वर्षी याच काळात 24 हजार 468 कोटी रुपयांचे दागिने निर्यात झाले होते. हिऱ्यांची निर्यात 77 टक्‍क्‍यांनी घटली आहे. मागील वर्षी एप्रिल-मे महिन्यांत 13 हजार कोटींचे हिरे निर्यात झाले होते. या वर्षी याच कालावधीत 2943 कोटींची हिरे निर्यात झाली. दरम्यान, व्यवसायात घट झाली असली, तरी आता परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे जेम्स अँड ज्वेलरी एक्‍सपोर्टस असोसिएशनचे म्हणणे आहे. 
मागील वर्षी एप्रिल-मे महिन्यांत 7927 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची निर्यात झाली. त्या तुलनेत या वर्षी लॉकडाऊनच्या काळात एप्रिल-मे महिन्यांत फक्त 634 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने निर्यात झाले. ही घट 92 टक्के आहे. याच काळात रंगीत खड्यांची निर्यात 408 कोटींवरून 28 कोटी 98 लाखांपर्यंत म्हणजे तब्बल 92.90 टक्‍क्‍यांनी घसरली. चांदीच्या दागिन्यांची निर्यात मात्र वाढली आहे. गेल्या वर्षी 614 कोटी रुपयांचे चांदीचे दागिने निर्यात झाले होते; या वर्षी 647 कोटींचे चांदीचे दागिने परदेशी गेले.

सवलती, कर्जाची अपेक्षा
काही महिने जागतिक लॉकडाऊनमुळे हिऱ्यांच्या दागिन्यांची निर्यात घटली आहे. आखाती देश व अमेरिकेत कोरोनाचा फैलाव सुरूच असल्याने व्यवसाय थंड आहे. चीन, ऑस्ट्रेलिया व युरोपातून मात्र दागिन्यांची मागणी हळूहळू वाढू लागली आहे. भारतातही दागिने निर्यातीचा व्यवसाय सावरत असून, "इझ ऑफ डुईंग बिझनेस' मोहिमेंतर्गत सवलती आणि सहजपणे कर्ज मिळाल्यास व्यवसाय उभारी धरेल, असे जेम्स अँड ज्वेलरी एक्‍सपोर्टस असोसिएशनचे पदाधिकारी सांगतात.

संबंधित बातम्या