डिजिटायजेशनसाठी गुगलचा बूस्टर पॅक

PTI
मंगळवार, 14 जुलै 2020

भारतात करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक
पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर सुंदर पिचाई यांची घोषणा
 

बंगळूर

देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी देण्यासाठी अल्फाबेट आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी आज दहा अब्ज डॉलरच्या (७५ हजार कोटी) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधल्यानंतर अवघ्या काही तासांतच पिचाई यांनी ही घोषणा केली. गुगलने आता अमेरिकेच्या बाहेर अन्य देशांत आपल्या कंपनीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने भारतात करण्यात आलेली ही गुंतवणूक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
पिचाई यांनी त्यांच्या घोषणेमध्ये म्हटले आहे की, ‘‘ गुगलकडून आम्ही भारतासाठी डिजिटायझेशन निधीची घोषणा करत आहोत. या माध्यमातून पुढील पाच ते सात वर्षांमध्ये भारतात ७५ हजार कोटी रुपयांची म्हणजे जवळपास दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येईल. रोख्यांमधील गुंतवणूक, भागीदारी, प्रत्यक्ष प्रकल्प उभारणी, पायाभूत बाबी आणि इको सिस्टिममधील गुंतवणूक आदींच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. या गुंतवणुकीतून आमचा भारताचे भवितव्य आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवरील विश्‍वास दिसून येतो.’’

मोदींचे कौतुक
पिचाई यांनी ही गुंतवणुकीची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियासाठीच्या व्हिजनचे कौतुक केले आहे. ‘‘ अब्जावधी भारतीयांना ऑनलाइन आणण्यात देशाने मोठी प्रगती केली आहे. परवडणाऱ्या दरातील डेटा, कमी किंमतीमधील स्मार्टफोन, जागतिक दर्जाच्या दूरसंचार पायाभूत सेवा आदींमुळे संधींची नवी दारे उघड झाली आहेत,’’ असेही पिचाई यांनी म्हटले आहे.

गुंतवणुकीचे चार स्तंभ
भारताच्या डिजिटायझेशनमध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या चार घटकांवर भर देऊन ही गुंतवणूक केली जाईल.
१) प्रत्येक भारतीयाला परवडणाऱ्या दरात त्याच्या भाषेत ॲक्सेस उपलब्ध करून देणे
२) भारतीयांच्या गरजा लक्षात घेऊन नवी उत्पादने, सेवांची निर्मिती
३) डिजिटल स्थित्यंतराच्या दिशेने पावले टाकणाऱ्या उद्योगांना बळ देणे
४) समाजाच्या भल्यासाठी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर. आरोग्य, शिक्षण आणि कृषीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर

ट्विट
आज सकाळी सुंदर पिचाई यांच्यासोबत अत्यंत फलदायी चर्चा झाली. अनेक घटक यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी होते. भारतीय शेतकरी, तरुण आणि नवउद्योजक यांना तंत्रज्ञानाच्या शक्तीचा लाभ मिळावा म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या