'हार्ले डेव्हीडसन' प्रेमींसाठी दु:खद बातमी; कंपनी भारतातील उत्पादन बंद करण्याच्या तयारीत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

हार्ले डेव्हिडसन या कंपनीच्या दुचाकींचे तरुणांमध्ये अक्षरश: वेड असते. अनेकदा ऑफरोडिंगसाठी या कंपनीच्या दुचाकींना पसंती दिली जाते. त्यामुळे हार्ले डेव्हिडसनच्या चाहत्यांसाठी ही बातमी दु:खद ठरू शकते.

दिल्ली: हार्ले डेव्हिडसन या अमेरिकन दुचाकी निर्मात्या कंपनीने भारतातील व्यवसाय प्रकल्प बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या भारतातील व्यापारी करार प्रक्रियेअंतर्गत हरियाणामधील बावळ येथे असणारे उत्पादन केंद्र बंद करण्याची घोषणा केली. याबरोबरच गुडगावमधील विक्री कार्यालयातही मोठी घट करण्याची कंपनीची योजना असल्याचे या दुचाकी उत्पादन करणाऱ्या कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हार्ले डेव्हिडसन या कंपनीच्या दुचाकींचे तरुणांमध्ये अक्षरश: वेड असते. अनेकदा ऑफरोडिंगसाठी या कंपनीच्या दुचाकींना पसंती दिली जाते. त्यामुळे हार्ले डेव्हिडसनच्या चाहत्यांसाठी ही बातमी दु:खद ठरू शकते. मात्र, या कंपनीकडून पुढे सांगण्यात आलं की, कंपनीच्या डीलर नेटवर्क करारातील ग्राहकांसाठी सेवा सुरुच राहणार आहे. यासाठी कंपनी आपले व्यवसाय मॉडेल बदलत आहे आणि आपल्या ग्राहकांना सेवा देत राहण्याच्या पर्यायांचे मूल्यांकनही करत आहे. कंपनी देशातील आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी काही कंपन्यांशी करार करण्याच्या विचारात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. 

देशातील आर्थिक स्थिती बिकट असताना या परिस्थितीत या कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे जवळपास 70 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार, पुढील 12 महिन्यांमध्ये पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची शक्यता आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या