‘कोविड-१९’ साथीमुळे पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’च्या दरात २३.९ टक्‍क्‍यांनी घसरण

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

कृषीवगळता उत्पादन, बांधकाम आणि सेवा यासह इतर सर्व क्षेत्रांनी तीव्र घसरण नोंदविल्याने देशाच्या एकूण ‘जीडीपी’ने ‘रिव्हर्स गिअर’ टाकल्याचे दिसून येते.

नवी दिल्ली: ‘कोविड-१९’च्या साथीचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून, यामुळे एकूण देशांतर्गत उत्पादनवाढीच्या दरात (जीडीपी ग्रोथ रेट) आजपर्यंतची सर्वांत मोठी घसरण नोंदली गेली आहे. सततच्या ‘लॉकडाउन’मुळे अर्थचक्र थंडावल्याने एप्रिल ते जून या तिमाहीत देशाचा ‘जीडीपी’ दर तब्बल २३.९ टक्‍क्‍यांनी घसरला.

याबाबतची अधिकृत आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. कृषीवगळता उत्पादन, बांधकाम आणि सेवा यासह इतर सर्व क्षेत्रांनी तीव्र घसरण नोंदविल्याने देशाच्या एकूण ‘जीडीपी’ने ‘रिव्हर्स गिअर’ टाकल्याचे दिसून येते. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेने ५.२ टक्‍क्‍यांनी प्रगती केली होती, असे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.

‘कोविड-१९’च्या साथीमुळे केंद्र सरकारने २५ मार्च २०२० पासून देशव्यापी ‘लॉकडाउन’ जाहीर केले होते व कालांतराने त्यात सातत्याने वाढ करण्यात आली होती. कारखाने बंद राहिल्याने उत्पादन क्षेत्रातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रातील एकूण मूल्यवर्धित (जीव्हीए) प्रगतीवर विपरीत परिणाम होऊन त्यात ३९.३ टक्के घट झाली. गेल्या वर्षीच्या तीन टक्के वाढीच्या तुलनेत ही घसरण लक्षणीय ठरली आहे. तथापि, कृषी क्षेत्राने थोडासा दिलासा दिला आहे. गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीतील तीन टक्‍क्‍यांच्या तुलनेत यंदा ‘जीव्हीए’मध्ये ३.४ टक्‍क्‍यांनी वाढ नोंदली गेली आहे.  

‘जीडीपी’ म्हणजे काय?
देशाच्या अर्थव्यवस्थेची तब्येत कशी आहे, याचे मोजमाप करण्याचे जे निकष आहेत, त्यात ‘जीडीपी’चे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

कोणत्याही देशात रोज असंख्य आर्थिक व्यवहार होत असतात. पण याची नोंद ठेवण्यासाठी देशाने एका आर्थिक वर्षात किती मालाचे उत्पादन केले व किती सेवा पुरविल्या, याची आकडेवारी मांडणे आवश्‍यक असते. विविध संस्था या कामांत कार्यरत असतात. आर्थिक वर्षात देशाने जो माल तयार केला व सेवा दिल्या, त्यांना प्राथमिक (शेती आदी), दुय्यम क्षेत्र (उद्योग, व्यवसाय आदी) व सेवा क्षेत्र यांत विभागले जाते. अशा वार्षिक उत्पादनाला बाजारी किमतीने गुणले, की जे उत्तर येईल ते म्हणजे ‘ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्‍ट (जीडीपी)’ अर्थात एकूण देशांतर्गत उत्पादन! ‘जीडीपी’ची वाढ हा कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीचा मापदंड असतो. ‘जीडीपी’ वाढीचा दर चांगला असेल, तर देशाची अर्थव्यवस्था प्रगती करीत आहे, नागरिकांना चांगले उत्पन्न मिळत आहे, बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे, औद्योगिक उत्पादनाला चांगला उठाव आहे, सेवा क्षेत्रातही चांगली मागणी दिसून येत आहे, असा त्याचा अर्थ होतो. थोडक्‍यात, देश आर्थिकदृष्ट्या प्रगती करीत आहे की नाही, याचा अंदाज आपल्याला ‘जीडीपी’ वाढीच्या दरावरून बांधता येऊ शकतो.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या