नागरिकांनी आरोग्य विमा घेण्यापूर्वी काळजी घ्यावी; 'आयआरडीएआय'ची माहिती

pramod sarawale
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

मंगळवारी  'आयआरडीएआय'ने काढलेल्या अधिकृत नोटीसमध्ये सांगितले आहे की,  'आयआरडीएआय' रजिस्टर्ड कंपनी किंवा त्यांच्या अधिकृत एजेंटलाच विमा विकण्याची परवानगी देते. जर तुम्ही यातील सोडून दुसऱ्या कोणाकडून आरोग्य विमा घेत असाल तर तुम्ही स्वतःला अडचणीत आणत आहात, असेही  'आयआरडीएआय'ने सांगितले आहे.

नवी दिल्ली- कोरोना काळात देशातील नागरिकांचा आरोग्य विमा घेण्याकडे ओढा वाढल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. याचा फायदा घेऊन बऱ्याच बनावट आणि अनधिकृत कंपन्या आरोग्य विमा विकून ग्राहकांना फसवत असल्याची गंभीर माहिती मंगळवारी  'आयआरडीएआय'ने दिली. याबद्दल ग्राहकांना सावधानतेचा इशारा  'आयआरडीएआय'ने दिला आहे. याबद्दल भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हटले आहे की, काही अनधिकृत संस्था आणि कंपन्या रुग्णालयाच्या खर्चातील आकर्षक सूट दाखवून आरोग्य विमा विकण्याचा प्रयत्न करत आहेत. 

मंगळवारी  'आयआरडीएआय'ने काढलेल्या अधिकृत नोटीसमध्ये सांगितले आहे की,  'आयआरडीएआय'रजिस्टर्ड कंपनी किंवा त्यांच्या अधिकृत एजेंटलाच विमा विकण्याची परवानगी देते. जर तुम्ही यातील सोडून दुसऱ्या कोणाकडून आरोग्य विमा घेत असाल तर तुम्ही स्वतःला अडचणीत आणत आहात, असेही  'आयआरडीएआय'ने सांगितले आहे. देशातील अधिकृत मान्यता प्राप्त विमा कंपन्यांची माहिती  'आयआरडीएआय'च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विमा खरेदी करताना सर्वांनी आपण योग्य पद्धतीने आणि खरा विमा खरेदी करत आहोत की नाही याची शहानिशा केली पाहिजे, असेही  'आयआरडीएआय'च्या नोटीसमध्ये सांगितले आहे.

जर तुम्हाला विमा घेताना संशय आला तर तुम्ही त्या कंपनीबद्दलची माहिती  'आयआरडीएआय'च्या वेबसाईटवर जाऊन पडताळू  शकता. तसेच त्या विमा कंपनीला संपर्क करण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. विम्याबद्दलच्या फेक कॉलपासून सावध राहिलं पाहिजे. त्यामुळे कधीही कोणताही विमा घेताना विमा कंपनीला किंवा रजिस्टर्ड एजेंटकडूनच तो खरेदी केला पाहिजे.

संबंधित बातम्या