मुंबई विमानतळ कामात गैरव्यवहार

Dainik Gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

जीव्हीकेचा अध्यक्ष, मुलासह 13 जणांवर गुन्हा
705 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप

मुंबई

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली जीव्हीके उद्योगसमूह व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी. वेंकट कृष्णा रेड्डी, त्यांचा मुलगा जी. व्ही. संजीव रेड्डी यांच्यासह 13 जणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. बनावट कार्यादेशांच्या मदतीने 705 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई विमानतळाच्या परिसरातील 200 एकर जागा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला विकासासाठी देण्यात आली होती. त्यासाठी काही कंपन्यांशी कंत्राट करून पैसे देण्यात आले; मात्र ही कामे प्रत्यक्षात झालीच नाहीत. बनावट कार्यादेशांच्या (वर्क ऑर्डर्स) मदतीने हे 310 कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया) नुकसान झाले. नऊ कंपन्यांनी बनावट इनपुट टॅक्‍स क्रेडिट घेतल्यामुळे केंद्र सरकारचीही फसवणूक झाली, असे तक्रारीत म्हटले आहे.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनीची 395 कोटी रुपयांची रक्कमही वापरण्यात आली. या कंपनीच्या वेतनपटावर दाखवलेले अनेक कर्मचारी प्रत्यक्षात हैदराबाद येथील जीव्हीके ग्रुपच्या कार्यालयात कामाला होते. त्यांचे वेतन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. कंपनीतून दिले जात होते. जी. वेंकट कृष्णा रेड्डी, जी. व्ही. संजीव रेड्डी यांच्यासह इतर आरोपींनी या काळात तब्बल 705 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी सीबीआयने जीव्हीके समूहाचे अध्यक्ष व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी. वेंकट कृष्णा रेड्डी, त्यांचा मुलगा जी. व्ही. संजीव रेड्डी यांच्यासह अन्य 11 व्यक्ती व कंपन्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

जॉइंट व्हेंचर कंपनी
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड नावाची जॉइंट व्हेंचर कंपनी जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया व इतर काही विदेशी कंपन्यांनी तयार केली होती. या संयुक्त कंपनीत जीव्हीके समूहाचे 50 टक्के, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे 26 टक्के समभाग असून, उर्वरित भाग इतर कंपन्यांकडे आहेत.

 

संबंधित बातम्या