लॉकडाऊन शिथिल, कारविक्रीला "पिक-अप'

Dainik Gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

कोरोनाच्या धास्तीचा परिणाम; सीएनजीकडे ग्राहकांचा कल

मुंबई

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कारविक्रीला "पिक-अप' येऊ लागला आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कारविक्रीत वाढ झाली असून, हुंडाई मोटर्स आणि मारुती सुझुकी यांनी तिप्पट विक्री केली आहे. दुचाकी वाहनांचाही खप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या धास्तीमुळे सार्वजनिक प्रवास टाळण्यासाठी अनेकांनी कार खरेदी करण्याला पसंती दाखवली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कार खरेदीत वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढतच असल्यामुळे ग्राहकांनी सीएनजी कार खरेदीकडे मोर्चा वळवल्याचे दिसते. विशेष म्हणजे, एप्रिलमध्ये एकही कार विकली गेली नव्हती.
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने जूनमध्ये 51,274 कारची विक्री नोंदवली. मे महिन्यात कंपनीच्या केवळ 13, 865 कार खपल्या होत्या. मारुतीने मागील वर्षी मे महिन्यात 1,23,250 आणि जूनमध्ये तब्बल 1,11,014 कारविक्रीचा टप्पा गाठला होता. मारुतीच्या छोट्या आणि कॉम्पॅक्‍ट सेगमेंटमधील सर्वधिक म्हणजे 37 हजारांपेक्षा अधिक वाहने विकली गेली आहेत. या वाहनांमध्ये सीएनजी यंत्रणा बसवली आहे किंवा बसवणे शक्‍य आहे. हुंडाई मोटर्सने जूनमध्ये एकूण 21,320 कार विकल्या. मे महिन्यात या कंपनीच्या केवळ 6883 कारची विक्री झाली होती. मागील वर्षी मे महिन्यात 42,007 आणि जूनमध्ये 42,502 वाहने विकली गेली होती.
मागील वर्षातील आकड्यांकडे पाहिले असता, मारुतीच्या कारविक्रीत 53.8 टक्के आणि हुंडाईच्या कारविक्रीत 49 टक्के घट झाली आहे. कार बुकिंग आणि खरेदीसाठी चौकशीचे प्रमाण 80 ते 85 टक्‍क्‍यांवर आल्याची बाब मात्र समाधानकारक असल्याचे कार उत्पादक कंपन्यांचे म्हणणे आहे. जूनमध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या 3866 कारची विक्री झाली. मे महिन्यात कंपनीच्या केवळ 1639 कार विकल्या गेल्या होत्या. होंडा मोटर्सने जूनमध्ये 1398 कारची विक्री केली.

दुचाकीलाही मोठी मागणी
कारच्या तुलनेत दुचाकी वाहनांच्या विक्रीत मोठी सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. हिरो मोटर कॉर्पने मे महिन्यात 1,12,682 दुचाकी विकल्या होत्या. जूनमध्ये कंपनीने 4,50,744 दुचाकी वाहने विक्रेत्यांकडे दिली आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागांतून दुचाकीला जास्त मागणी आहे. मान्सून आणि रब्बी पीक चांगले होण्याच्या अंदाजामुळे दुचाकी वाहनांचा खप वाढेल, असा अंदाज हिरो मोटर्सचे संचालक पवन मुंजाल यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनामुळे नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळत आहेत. त्यामुळे अनेक जण कार खरेदी करत आहेत. म्हणून जूनमध्ये कारविक्री वाढल्याचे आढळते.
- शशांक श्रीवास्तव, विक्री आणि पणन अधिकारी, मारुती सुझुकी.

कारबाजार
- जूनमध्ये मारुती, हुंडाईच्या कारविक्रीत तिप्पट, चौपट वाढ.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र कारविक्रीत 55 ते 40 टक्के घट.
- कार बुकिंग आणि चौकशी 80 ते 85 टक्‍क्‍यांवर.
- कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांचा कार खरेदीकडे कल.
- कार खरेदीला ग्रामीण भागातून अधिक प्रतिसाद.
- पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे सीएनजी कार खरेदीला पसंती.
- कारपेक्षा दुचाकी वाहनांच्या मागणीत मोठी वाढ.
- चांगला पाऊस, रब्बी हंगामाच्या अंदाजामुळे वाहन विक्रीत वाढ होणार.

संबंधित बातम्या