महाराष्ट्रातील 11 हजारांहून अधिक उद्योग कागदावर

Dainik Gomantak
सोमवार, 1 जून 2020

अर्थव्यवस्था सावरण्यासाठी राज्य सरकार उद्योगांसाठी सुधारित नियमावली आणणार

मुंबई

टाळेबंदीमुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी राज्य सरकार उद्योगांसाठी सुधारित नियमावली तयार करत आहे; मात्र सद्यस्थितीत 11 हजारांहून जास्त उद्योग हे फक्त कागदावरच आहेत. राज्य सरकारने उद्योग उभारण्यासाठी परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्षात हे उद्योग सुरू झालेले नाहीत.
राज्य सरकारच्या 2019-20 आर्थिक पाहणी अहवालानुसार 20 हजार 501 उद्योगांना राज्यात परवानगी मिळाली आहे. त्यातून 13 लाख दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे; मात्र प्रत्यक्षात नऊ हजार 99 उद्योग सुरू झाले आहेत. ऑगस्ट 1991 पासून 2014-2015 पर्यंत राज्यात 18 हजार 709 प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती. त्यानंतर 2014-15 पासून 2019-20 पर्यंत एक हजार 792 नव्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली. त्यातील 723 प्रकल्प सुरू झाले आहेत.

राज्याला फक्त 23 टक्के गुंतवणुकीतून उत्पन्न
राज्यात आतापर्यंत 13 लाख दोन हजार 501 कोटी रुपयांच्या उद्योग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असली, तरी त्यातील फक्त तीन लाख सहा हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्योग सुरू झाले आहेत. म्हणजे फक्त 23 टक्के गुंतवणुकीतून उत्पन्न सुरू झाले आहे. फक्त उद्योग समूहांशी करार झाला म्हणजे रोजगार निर्माण झाले असे होत नाही. जमिनीचे हस्तांतरण, स्थानिक पायाभूत सुविधा, अपेक्षित मनुष्यबळ हे सर्व घटकही महत्त्वाचे आहेत. अनेक वेळा राज्य सरकारने करार केल्यानंतरही प्रत्यक्षात उद्योग अनेक वर्षे सुरू झालेले नाहीत.

टाळेबंदीचा स्थानिक स्वराज्य संस्थांना फटका
टाळेबंदीमुळे राज्य सरकारबरोबरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. हे उत्पन्न भरून काढायचे असेल, तर नवे उद्योग सुरू करणे अपेक्षित आहे. यासाठी राज्य सरकारनेही विविध परवान्यांऐवजी एकच महापरवाना पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग सुरू झाल्यानंतर इतर परवाने एकदोन वर्षांत घेण्याची मुभा देण्यात येणार आहे. तसेच पर्यावरणाला हानी नसलेले प्रकल्प तात्काळ सुरू करता येणार आहेत.

2014-15 मधील गुंतवणूक
18 हजार 709 उद्योगांतून 10 लाख 63 हजार 342 गुंतवणूक करण्याच्या उद्योगांना मंजुरी दिली होती; तर आठ हजार 376 उद्योग सुरू झाले होते. त्यांची गुंतवणूक दोन लाख 54 हजार 784 कोटी रुपयांची होती.

2019-20 मधील गुंतवणूक
13 लाख दोन हजार 518 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या 20 हजार 501 प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती. त्यातील नऊ हजार 99 उद्योग सुरू झाले होते. त्यांची गुंतवणूक तीन लाख सहा हजार 862 कोटी रुपयांची होती.

वर्ष-मंजूर प्रकल्प-एकूण गुंतवणूक (कोटी)-प्रत्यक्ष सुरू-गुंतवणूक (कोटी)
2019-20-20,501--13,02,518---9,099---3,06,862
2018--19---20,323---12,86,696---9,098--3,06,825
2017-18----19,826---11,99,815---8,974---2,92,252
2016-17----19,437--11,37,783--8,664---2,69,814
2015-2016---19,053---10,97,337--8,497---2,62,631
2014-2015---18,709---10,63342---8,376---2,54,784

संबंधित बातम्या