आर्थिक मदत पॅकेजमुळे एमएसएमईच्या उद्योगांना मोठी चालना: गडकरी

Pib
सोमवार, 18 मे 2020

कृषी एमएसएमई आणि मत्स्योद्योग एमएसएमई या क्षेत्रांचाही  शोध घेण्याची गरज असल्याचे मत नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.

मुंबई,

केंद्र सरकारनं एमएसएमई, कामगार, कृषी यांच्यासह विविध क्षेत्रांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या पॅकेजमुळे आणि एमएसएमईची नवीन व्याख्या केल्यामुळे उद्योग व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल, असं मत केंद्रीय एमएसएमई आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

एमएसएमईच्या मानांकनाचे अन्वेषण आणि ‘फंड ऑफ फंड’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहभागीतांनी आपल्या शिफारसी आणि सल्ले द्यावेत, असं आवाहन गडकरी यांनी  केलं. 

बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल आणि एमएम अॅक्टिव्ह साय-टेक कम्युनिकेशन्स यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. अनुक्रमे ‘‘कोविड-19 चा एमएसएमई क्षेत्रावर पडणारा प्रभाव’’ आणि ‘‘20 लाख कोटींच्या पॅकेजनंतर भारतीय उद्योगविश्वाचे भवितव्य’’ या विषयांवर गडकरी यांनी मार्गदर्शन केले.

कृषी एमएसएमई आणि मत्स्योद्योग एमएसएमई या क्षेत्रांचाही  शोध घेण्याची गरज असल्याचे मत नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.

कोविड-19 महामारीमुळे सर्व उद्योग क्षेत्रांपुढे  त्याचबरोबर सरकारसमोरही आव्हाने निर्माण झाली आहेत. मात्र अशा संकटाच्या काळात नकारात्मक विचार करणे कोणाच्याही हिताचे ठरणार नाही. सर्वांनी सकारात्मक भावनेने एकत्रितपणे या आव्हानांना तोंड देण्याची आवश्यकता असल्याचे गडकरी म्हणाले.

जपान सरकारने आपल्या सर्व उद्योजकांना चीन देशांमध्ये केलेली गुंतवणूक काढून घ्यावी आणि आपले उद्योग-व्यवसाय इतरत्र न्यावेत, यासाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे, याचे स्मरण नितीन गडकरी यांनी यावेळी सर्वांना करून दिले आणि ही एक भारतासाठी उत्तम संधी आहे, तिचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

हरित द्रूतगती महामार्ग प्रकल्पाचा संदर्भ देवून गडकरी म्हणाले,  ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागामधून जात असलेल्या या ‘‘नवी दिल्ली ते मुंबई हरित द्रुतगती महामार्गाचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. त्यामुळे या मार्गावर सुसज्ज ‘लॉजिस्टिक्स पार्क’ निर्मितीसाठी भविष्यात गुंतवणूक करण्याची उद्योगांना सुसंधी आहे. यामुळे अविकसित आणि ग्रामीण, आदिवासी क्षेत्रांमध्ये नवीन व्यवसायांना चालना मिळू शकेल. आता मोठ्या किंवा मेट्रो शहरातल्या उद्योगांच्या विकेंद्रीकरणाची गरज आहे. त्याचबरोबर देशातल्या ग्रामीण भागात, आदिवासी आणि मागास भागांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

आजच्या काळात निर्यात वृद्धीकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि जागतिक बाजारपेठेतल्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी गुणवत्तेबरोबरच उत्पादन खर्च, विजेचा खर्च कमी करण्याची गरज आहे, असं सांगून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी एक उदाहरण दिले. यामध्ये वाहनांसाठी स्क्रॅप धोरण निश्चित करून नवीन वाहन निर्मितीचा खर्च कमी करता येवू शकतो, हे स्पष्ट केले. आयातीला चांगला पर्याय उपलब्ध करून देण्याच्या आवश्यकतेवर भर देण्याची गरज असल्याचे सांगताना, गडकरी यांनी परदेशी आयातीला देशांतर्गत गुणवत्तापूर्ण उत्पादनाचा पर्याय आहे, असं सांगितलं. एमएसएमई मंत्रालयानं गेल्या तीन वर्षांमध्ये निर्यात आणि आयात याविषयावर खूप काम केले आहे. याकाळात दोन पुस्तिका काढण्याचे काम सुरू असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.

उद्योग व्यवसायांमध्ये नवीन संकल्पना, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन कौशल्य आणि ज्ञान,अनुभव यांच्या जोरावर त्यांचे संपत्तीमध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता आहे, असंही गडकरी यांनी नमूद केलं.

बैठकीत सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी यावेळी काही प्रश्नही विचारले, त्याला मंत्री गडकरी यांनी उत्तरे दिली. यामध्ये ‘कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करताना ‘आपत्तीला आशीर्वाद मानून संधी’ कशी शोधायची? अशा संकटाच्या काळात कंपन्यांसाठी कोणता संदेश आहे? सूक्ष्म उद्योगांना फायदा व्हावा म्हणून मुद्रा योजना कर्ज मर्यादेत वाढ करण्यात येणार का? तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या 3 लाख कोटींच्या तारणमुक्त कर्जाविषयी प्रश्न विचारण्यात आले.

बैठकीत विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना गडकरी यांनी उत्तरे दिली. तसेच सरकारकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही दिली. कोविड-19 महामारीचे संकट संपुष्टात येईलच त्यामुळे सर्व उद्योजकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून येणा-या संधींचा लाभ घेण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.

संबंधित बातम्या