व्याजदर कपातीचा उपाय विचाराधीन: आरबीआय गव्हर्नर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

सध्याची स्थिती पाहता आम्हाला सर्व उपाय राखीव ठेवायचे आहेत. त्यामुळे सध्या दरकपात न करता व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले, असेही ते म्हणाले. 

मुंबई: कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी व्याजदर कपातीसह अन्य उपाय रिझर्व्ह बॅंक केव्हाही वापरू शकते, असे मत गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज एका वेबिनारमध्ये व्यक्त केले. सध्याची स्थिती पाहता आम्हाला हे सर्व उपाय राखीव ठेवायचे आहेत. त्यामुळे सध्या दरकपात न करता व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले, असेही ते म्हणाले. 

यापूर्वी केलेल्या व्याजदर कपातीमुळे कर्जे स्वस्त झाल्यासह अनेक फायदे झाल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. यापूर्वी दोन वेळा रिझर्व्ह बॅंकेने १.१५ टक्के व्याजदर कपात केली. मात्र, त्यानंतर चलनवाढीचा दर वेगाने वाढल्यामुळे मागील पतधोरणात व्याजदर कपात करण्यात आली नाही. मात्र, धोरण पुरेसे लवचिक असल्याने जेव्हा परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा रिझर्व्ह बॅंक केव्हाही पावले उचलू शकेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच सरकारी रोख्यांच्या व्याजदरासंदर्भातील धोरणे अर्थहीन ठरल्याच्या आरोपांचाही त्यांनी इन्कार केला. 

लवकरच विकासदराचा अंदाज!
सध्याच्या अनिश्‍चिततेमुळे रिझर्व्ह बॅंकेने विकासदर आणि चलनवाढ याबाबतचे अंदाज प्रसिद्ध केले नाहीत. मात्र, कोरोनाची साथ आटोक्‍यात आली की ते जाहीर केले जाईल, असे दास म्हणाले. अनेकदा विकासदर हा केवळ देशांतर्गत घडामोडींवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरही अवलंबून असतो. त्यामुळे आपण कोणतीही माहिती दडवून ठेवत नाही, असेही दास यांनी नमूद केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या