कामाचे तास वाढवण्यास विरोध

Dainik Gomantak
रविवार, 10 मे 2020

फॅक्टरी कायद्याच्या ५१, ५२, ५४ व ५६ मध्ये दुरुस्ती करून कामगारांना भरपूर काम देण्याची तरतूद केली आहे.जगभरात कामाचे आठच तास असताना केवळ गोव्यात त्याला अपवाद केला गेला आहे हे चुकीचे आहे.

पणजी

राज्य सरकारने फॅक्टरी कायद्यातील तरतूदी बाजूला सारून कामगारांना १२ तास काम देण्यास मुभा दिली आहे. ही तरतूद अन्यायकारक असून ती तत्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी गोवा कामगार परीषद या सर्व कामगार संघटनांच्या एकत्रित मंचाने केली आहे. गोवा चेंबर ऑप कॉमर्सने सरकारकडे ही मागणी केल्यानंतर सरकारने तशी मुभा देणारी अधिसूचना जारी केली आहे.
त्याला विरोध करताना परिषदेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. ही अन्यायकारक तरतूद तत्काळ मागे घ्यावी अशी मागणी करताना या पत्रात नमूद केले आहे, की फॅक्टरी कायद्याच्या ५१, ५२, ५४ व ५६ मध्ये दुरुस्ती करून कामगारांना भरपूर काम देण्याची तरतूद केली आहे.जगभरात कामाचे आठच तास असताना केवळ गोव्यात त्याला अपवाद केला गेला आहे हे चुकीचे आहे. जादा काम केल्यास दुप्पट वेतन देण्याची तरतूद पूर्वी होती. त्याशिवाय आठवड्याला केवळ ४८ तास काम देता येत होते, त्याऐवजी कामगारांना आता ६० तास काम देता येणार आहे.
सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही, सकाळी ८ ते रात्री ८ असे काम करून कामगार मेटाकुटीला येतील याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे. १२ तास काम करत नाही हे कारण पुढे करून कामगाराला कामावरून कमी करण्यासाठी व्यवस्थापनाच्या हाती सरकारने कोलीत दिल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

संबंधित बातम्या