सेन्सेक्सलाही संसर्ग; निर्देशांकामध्ये ११०० अंशांची घसरण

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

गुरुवारी सकाळी बाजार उघडतानाच निर्देशांकात घसरणीला सुरवात झाली. घसरणीची मालिका आज दिवसभर सुरूच होती. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३६ हजार ५५३.६० अंशांवर; तर निफ्टी १० हजार ८०५.५५ अंशांवर स्थिरावला.

मुंबई: अमेरिकी बाजारात झालेली घसरण आणि कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारतीय शेअर बाजारांत आज मोठी घसरगुंडी झाली  मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १ हजार ११४ अंशांनी; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३२६ अंशांनी घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या समभागांचे मूल्य तब्बल चार लाख कोटी रुपयांनी रोडावले आहे.

गुरुवारी (ता. २४) सकाळी बाजार उघडतानाच निर्देशांकात घसरणीला सुरवात झाली. घसरणीची मालिका आज दिवसभर सुरूच होती. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३६ हजार ५५३.६० अंशांवर; तर निफ्टी १० हजार ८०५.५५ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्‍सवर नोंदवलेल्या सर्व कंपन्यांचे एकत्रित मूल्य बुधवारच्या १५२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत आज १४८ लाख कोटी रुपयांनी घसरले. गेल्या सात सत्रांमध्ये सेन्सेक्‍स सुमारे तीन हजार अंशांनी घसरला आहे. 

आज निफ्टी निर्देशांकातील ५० प्रमुख समभागांपैकी फक्त भारती इन्फ्राटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर व झी एंटरटेनमेंट हे तीनच समभाग लहान-मोठी वाढ दर्शवत बंद झाले. उरलेले ४७ समभाग नुकसानीत बंद झाले. सेन्सेक्‍सच्या ३० समभागांपैकी फक्त हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये वाढ झाली.

घसरणीची कारणे

  • जागतिक बाजारातील मंदीचे वातावरण
  • अमेरिकी बँकांच्या व्यवहारांचा लीक झालेला डेटा
  • अन्य आशियायी बाजारांवरील मंदीचे मळभ
  • जगभरातील कोरोनाचा वाढता संसर्ग
  • बड्या देशांतील मागणीमध्ये घसरण
  • गुंतवणूकदारांनी घेतलेला आखडता हात

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या