Share Market : सलग तीन व्यवहारातील तेजीला ब्रेक; सेन्सेक्स आणि निफ्टी घसरला  

Share Market
Share Market

देशातील भांडवली बाजाराने सलग तीन व्यवहारात तेजी नोंदवल्यानंतर आज चौथ्या सत्रात मोठी घसरण नोंदवली आहे. काल तिसऱ्या सत्र व्यवहाराच्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज 598.57 अंकांनी खाली आला. त्यामुळे सेन्सेक्सने 51 हजाराची पातळी सोडली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 174.05 अंशांनी घसरल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कालच्या तिसऱ्या सत्र व्यवहाराच्या तुलनेत 632.51 अंकांनी खाली येत 50,812.14 अंशांवर खुला झाला. आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 218.85 ने घसरत 15,026.75 वर उघडला. त्यानंतर दिवसभरात दोन्ही निर्देशकांनी उतार नोंदवल्याचेच पाहायला मिळाले. 

आज आठवड्याच्या चौथ्या सत्र व्यवहारात देशातील सर्वात जुना शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई 598.57 अंकांनी घसरून 50,846.08 वर बंद झाला. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 164.85 अशांनी खाली येत 15,080.75 च्या स्तरावर बंद झाला. तर आठवड्याच्या मागील तिन्ही सत्रात देशातील दोन्ही निर्देशांकांनी तेजी नोंदवली होती. मागील सलग तीन व्यवहारांमध्ये मुंबई शेअर बाजाराने 4.71 टक्क्यांनी व राष्ट्रीय शेअर बाजाराने 4.86 टक्क्यांनी वाढ नोंदवली होती. मात्र आजच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1.16 टक्क्यांनी व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 1.08 टक्क्यांनी खाली आला. 

आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहारात म्हणजे काल सेन्सक्स तब्बल 1147.76 अंकांनी वधारत 51,444.65 वर पोहचला होता. आणि त्यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 326.50 अशांनी वाढत 15,245.60 च्या स्तरावर बंद झाला होता. त्यामुळे आठवड्याच्या आणि महिन्याच्या एकाच सत्रात दोन्ही बाजारांनी काल मोठी वाढ नोंदवली होती. व यानंतर काल तेजीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती 9.41 लाख कोटी रुपयांनी वाढली होती. पण आज या तेजीला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले. आज सेन्सेक्स दिवसभराच्या व्यवहारात 51,256.55 आणि निफ्टी 15,202.35 या उच्चांकी पातळीवर पोहचला होता. 

कालच्या तुलनेत आज गुंतवणूकदारांनी दाखवलेली नफेखोरी आणि जगातील उर्वरित भांडवली बाजारांमध्ये दिसलेल्या घसरणीचा प्रभाव देशातील शेअर बाजाराच्या व्यवहारावर झाल्याने घसरण पाहायला मिळाल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. आजच्या व्यवहारात ओएनजीसी, एसबीआय, बँक ऑफ बरोडा, एशियन पेंट आणि मारुती सुझुकी यांचे समभाग वधारले. तर डॉक्टर रेड्डीज, कोटक महिंद्रा बँक, पॉवरग्रिड, सेंट्रल बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, टीसीएस,लार्सन अँड टुब्रो, टायटन, टेक महिंद्रा,बजाज फायनान्स, भारती एअरटेल, महाराष्ट्र बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो,  एनटीपीसी यांच्या समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली.      

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com