बांगलादेशाची आर्थिक प्रगती!
bangladesh

बांगलादेशाची आर्थिक प्रगती!

साल २०१५ मध्ये बांगलादेशाच्या तुलनेत भारताचे दरडोई उत्पन्न ४० टक्क्यांपेक्षाही जास्त भरले होते. साल २०१७ पासून भारताच्या विकासाचा वेग कमी होत गेला, तर याउलट बांगलादेशातील विकास दर वेगवान झाला. विश्‍व नाणेनिधीच्या म्हणण्याप्रमाणे विद्यमान वर्षात बांगलादेशाचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा ११.४५ डॉलरपेक्षाही जास्त असेल. थोडक्यात सरासरी विनिमय दराचा निकष घेतल्यास व दोन्ही देशांची लोकसंख्या मोजणी अचूक आहे, असे गृहित धरल्यास बांगलादेश भारतापेक्षाही ‘श्रीमंत’ ठरला. काही महिन्यांपूर्वी विश्‍व नाणेनिधीने यावर्षी भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात ४.५ टक्क्यांची घट हाईल, असा विश्‍वास व्यक्त केला होता. आता आपल्या अंदाजात बदल करून यावर्षी भारताची आर्थिक घट आधी वर्तविलेल्या अंदाजापेक्षाही जास्त म्हणजे तब्बल दहा टक्क्यांनी आकुंचित होईल, तर याच काळात बांगलादेश सरासरी ४ टक्केदराने अपेक्षित वाढ साध्य करेल. थोडक्यात यावर्षी भारताची सर्वांत खराब अर्थव्यवस्थांमध्ये गणना होणार. त्‍या तुलनेत आर्थिक वाढीबाबत बांगलादेश उज्ज्वल स्थान प्राप्त करेल. 

जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर विकसित देशांबरोबरच जगभरातील बऱ्याच देशांमध्ये आर्थिक नकारात्मकता नोंदविली जाईल. बांगलादेशासारख्या अवघ्या काही देशांतच यावर्षी सुबत्ता दिसेल. दूरगामी राजकीय नेतृत्व, कुशल व्यवस्थापन, नीटसे नियोजन या गोष्टी बांगलादेशात अपेक्षित बदल घडवू शकले. यात वाद नसावा. 

साल २००९ मध्ये बांगलादेशमधील राष्ट्रीय उत्पन्न सुमारे १०० अब्ज अमेरिकी डॉलरच्या आसपास होते. साल २०१९पर्यंत हा आकडा ३०० अमेरिकी डॉलरपर्यंत वाढलं. साल २००९ पासून सतत बांगलादेशात ६ पेक्षाही जास्त विकास दर अनुभवला. विदेशी गुंतवणुकीबाबतही बांगलादेशाने अशीच सरशी मिळविली. साल २००९ मधील ७०० डॉलरपासून साल २०१९ मधील ३००० अब्ज डॉलर विदेशी गुंतवणूक मिळवेपर्यंत बांगलादेशाने मोठी मजल मारली. २०००-२०१० या दशकातील गरीब  देशातील गणनेपासून साल २०१५ मध्ये बांगलादेशाने निम्न मध्यम उत्पन्न देशामीधल स्थान प्राप्त केले, तर साल २०२४ पर्यंत विकसनशील देशांच्या श्रेणीत स्थान पटकाविण्यासाठी हा देश सिद्ध झाला आहे. 

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपण देशभरात आत्मनिर्भरतेच्या जाहिरातबाजीत दंग असतानाच बांगलादेशच्या पंतप्रधानांनी आपल्या देशाच्या स्वावलंबनाच्या ऐतिहासिक कामगिरीचा पुरवा दिला. जगभरात तांदूळ उत्पादनाबाबत चौथे स्थान, पाट उत्पादन (जूट) जगात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान, आंबा उत्पादनात चौथे स्थान, आंतरर्देशीय गोड्या पाण्याचे मासे उत्पादन व मत्स्यपालनात चौथे स्थान, तर भाजीपाला उत्पादनात जगात पाचवे स्थान पटकावले आहे. तयार कपडे (वस्त्रोद्योग) क्षेत्रात तर बांगलादेशाचा दबदबा असून, हा देश निर्यातीत खूपच अग्रेसर आहे. 

साल २०१३ मध्ये दारिद्र्यनिर्मूलन क्षेत्रात फारच मोठी प्रगती दर्शविल्याबद्दल बांगलादेशाला जागतिक पुरस्कार प्राप्त झाला, तर दक्षिण आशिया खंडामधील देशांचा विचार केल्यास बांगलादेशातील विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन तर फारच उदार व अग्रेसर आहे. दक्षिण आशिया मधील सर्व देशांमध्ये बांगलादेशाचा विदेशी गुंतवणूक मिळविण्याबाबत दुसरा क्रमांक लागतो. इंग्लंडमधील ‘प्राईस वॉटर हाऊस’ या सल्लागार संस्थेच्या निकषांप्रमाणे साल २०५० पर्यंत बांगलादेश विश्‍वातील २३ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरेल ‘गोल्डमॅन सॅच्स्‌’ या संस्थेनुसार ब्राझिल, भारत, चीन, कॅनडा व दक्षिण आफ्रिकेबरोबरीनेच बांगलादेश जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्‍वाचा घटक बनेल. 

भारतासाठी मोठी शिकवण 

भारतीय ‘रुपया’प्रमाणे बांगलादेशी ‘टका’ तसा स्वतंत्र नाही. आपल्या रुपयाच्या तुलनेत टका खूपच मोठे अतिरिक्षण (ओव्हर व्हॅल्युएशन) झाले असून, त्याच्या अर्थव्यवस्थेला थोडी सूज आल्यासरखे भासते. चलनाची ‘खरेदी-विक्री शक्ती’ गृहित धरल्यास बांगलादेशीय अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा मोठी वाटते. प्रत्यक्षात विनिमय दराच्या निकषांवर तुलना केल्यास आपली अर्थव्यवस्था मोठी असल्याचे दिसेल. खरेदी विक्री शक्तीचा निकष लावल्यास भारताचे दरडोई उत्पन्न ६२८४ डॉलर तर बांगलादेशाचे दरडोई उत्पन्न ५१३९ डॉलर ठरावे. याचाच अर्थ बांगलादेशाची मोठी आर्थिक प्रगती झाली, असे न म्हणता आर्थिक प्रगतीबाबत अलीकडे भारत मागे पडला, असे म्हणावे लागेल. कोविड महामारीच्या काळात हे अंतर वाढले व आपली मोठी फरफट झाली, असा या आकड्यांचा संदर्भ ठरतो. 
देशाचे विकासधोरण कसे असावे, हे आपल्याला बांगलादेशाकडून शिकता येईल. केवळ मोठी घोषणाबाजी व भाषणबाजी टाळून कसोशीने प्रत्येक पर्यायांवर नीट लक्ष दिल्यास आपली सरशी होणे तसे कठिण नसावे. 

बांगलादेश येत्या पाच वर्षात देशात मोठी विदेशी गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी १०० विशेष आर्थिक विभागांची निर्मिती करणार आहे. थेट निर्यातप्रधान उद्योगांना या विभागांमध्ये स्थान देऊन लाखो रोजगार संधी बांगलादेशवासियांना देण्यासाठी हे असले आर्थिक विभाग सज्ज होत आहेत. विदेशी गुंतवणुकीला देशाच्या आर्थिक विकासाला पुरक मानून गुंतवणुक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी देशात प्रयत्न होत आहेत. यासाठी साल २०१८ मध्ये बांगलादेशाने विदेशी गुंतवणुकदारांसाठी ‘एक खिडकी सहाय्य’ योजनेंची सुरुवात केली आहे. व्यवसाय सुलभीकरण, जलद न्याय, वेळबद्ध गुणवत्तायुक्त सेवा व गुंतवणुकदारांच्या दारापर्यंत जाऊन सेवा देण्याची वृत्ती, देशात रुजविण्यासाठीया कायद्याने अमुलाग्र बदल घडविला. साल २०११ पर्यंत ‘मध्यम उत्पन्न’ देशामधील यादीत स्थान, साल २०३० पर्यंत संयुक्त राष्ट्र संघटनेने निश्‍चित केलेले विकास लक्ष गाठण्यासाठी, साल २०४१ पर्यंत विकसित देशांच्या यादीत स्थान मिळविण्यासाठी, तर साल २१०० पर्यंत ‘आर्थिक महासत्ता’ होण्यासाठी खास कलमी कार्यक्रम राबविले जात आहेत. 

थोडक्यात देशाला निवडणुकीपर्यंत निवडणुकांसाठी स्वप्ने दाखविण्यापेक्षा एक ठसठशीत व दूरगामी परिणाम करू शकणारे ठोस कार्यक्रम राबविले जात आहेत. अर्थात देशातील एका व्यक्तीपेक्षाही देश श्रेष्ठ हाच संदेश दिला जात आहे. दुर्दैवाने भारतातील विद्यमान परिस्थिती ही नेमकी उलटी आहे. 

आयएमएफच्या अंदाजानुसार येत्या पाच वर्षात भारताच्या आर्थिक आघाडीला गती मिळेल. पण, यासाठी विकासकेंद्रीत कार्यक्रमांची गरज भासेल. जात, पात, धर्म, देव, पुतळे व व्यक्तपूजा या गोष्टींना प्राधान्य दिल्यास बजबजपुरीशिवाय आपल्या हाती काहीच गवसणार नाही. भ्रष्टाचार, प्रशासकीय चालढकल व मोठी लोकसंख्यावाढ भारताच्या प्रामाणिक प्रयत्नांना खीळ घालतील. देशात वाढती बेरोजगारी, उद्योग सुलभतेची अनास्था व भाषणबाजीतून केलेला बुद्धिभेद आपली आर्थिक नाडी मंद करत आहे. 

तुलनेत वाढत्या इस्लामी कट्टरवादाला झुगारुन, लोकसंख्यावाढीला आवर घालत व धोरणात सुलभीकरण करत बांगलादेश दरवर्षी मजल-दरमजल करत प्रगती साध्य करीत आहे. एकेकाळी भारताने स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या व विश्‍वाच्या गणतीत नसलेला बांगलादेश प्रगतीपथावर अग्रेसर आहे. बांगलादेशाचे अभिनंदन खुल्या मनाने करताना आपल्या भारतातील प्रगतीची अवहेलना करण्याचे प्रयत्न हाणून पाडायला हवेतच, पण गरज आहे आपल्या शेजारी राष्ट्राकडून चांगले ते शिकण्याची, अनुकरणाची.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com