सणासुदीसाठी कर्मचारी आणि राज्यांनाही सरकारने जाहीर केले 'गिफ्ट'

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

बाजारात मागणी निर्माण करण्यासाठी आणि त्यासाठी लोकांना पैसे खर्च करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे आज आणखी एका आर्थिक मदतयोजनेची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांनी न वापरलेल्या प्रवासभत्त्याची (एलटीसी) रक्कम मिळणार आहे. तर भांडवली आघाडीवर राज्यांना पन्नास वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या उपायांमुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या मागणीची निर्मिती अर्थव्यवस्थेत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज या नव्या योजनेची घोषणा केली. या योजनेत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित दोन भाग आहेत. त्यानुसार पहिल्या योजनेत कर्मचाऱ्यांना कोरोना साथीमुळे ‘एलटीसी’ किंवा सुटीचा प्रवासभत्ता घेता आलेला नाही आणि आगामी काळातही तशी शक्‍यता फारशी नसल्याने त्या भत्त्याचे त्यांच्या श्रेणीनुसार लागू होणारे पैसे त्यांना रोख (कॅश व्हाऊचर) स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्याने ३१ मार्च २०२१ पर्यंत डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून खर्च करणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे ज्या वस्तुंवर १२ टक्के किंवा त्याहून अधिक जीएसटी असेल त्या वस्तूंवरच तो ही रक्कम खर्च करु शकणार आहे.

जीएसटी नोंदणीकृत दुकानांमध्येच तो यासंबंधीचे व्यवहार करु शकणार आहे. ही रक्कम बिगर-खाद्यवस्तूंवरच खर्च करावी लागणार आहे. त्याच्या श्रेणीनुसार त्याला रेल्वे किंवा विमानाचे ज्या वर्गाचे भाडे लागू होत असेल त्याच्या तिप्पट खर्च करण्याचे बंधनही त्याच्यावर राहणार आहे. 

दुसरी योजना सणासुदीसाठी ‘ॲडव्हान्स’ किंवा ‘उचल’ घेण्यासंबंधीची आहे. सहाव्या वित्त आयोगापर्यंत ही सवलत सरकारी कर्मचाऱ्यांना उपलब्ध होती. परंतु सातव्या वेतन आयोगाने ती रद्द केली होती. तिचे पुनरुज्जीवन या निमित्ताने, परंतु केवळ एकदाच व अपवाद म्हणून केले जाईल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. या योजनेत कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांचे रुपे क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. या कार्डात आधीच दहा हजार रुपयांची रक्कम भरण्यात आलेली (प्री लोडेड) असेल. या कार्डाच्या वापराची मुदतही ३१ मार्च २०२१ पर्यंतच असेल. ही दहा हजार रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून दहा समान हप्त्यांद्वारे वसूल करण्यात येईल. पूर्वी ही सवलत केवळ अराजपत्रित (नॉनगॅझेटेड) कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होती. परंतु आता ही सवलत सर्वांसाठी देण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या