स्टेट बॅंकेने घटविले ठेवींवरील व्याजदर! ‘वुईकेअर सिनियर सिटिझन्स’ योजनेला वर्षअखेरपर्यंत मुदतवाढ

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

सुधारित व्याजदर रचनेनुसार, एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेव योजनेचा व्याजदर ०.२० टक्‍क्‍यांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे या मुदतीच्या ठेवींसाठी आता सर्वसाधारण नागरिकांना ४.९० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ५.४० टक्के व्याज दिले जाणार आहे. 

पुणे: स्टेट बॅंकेने निवडक मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. नवे व्याजदर १० सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या ‘वुईकेअर सिनियर सिटिझन्स’ मुदत ठेव योजनेला या वर्षअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सुधारित व्याजदर रचनेनुसार, एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेव योजनेचा व्याजदर ०.२० टक्‍क्‍यांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे या मुदतीच्या ठेवींसाठी आता सर्वसाधारण नागरिकांना ४.९० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ५.४० टक्के व्याज दिले जाणार आहे. 

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्टेट बॅंकेने ‘वुईकेअर सिनियर सिटिझन्स’ ठेव योजना मे महिन्यात जाहीर केली होती. तिची मुदत येत्या ३० सप्टेंबरला संपणार होती. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन तिला ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पाच वर्षे मुदतीच्या या योजनेत सर्वसाधारण नागरिकांना मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा ०.८० टक्के अधिक दर ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो. सुधारित व्याजदर रचनेनुसार, या विशेष योजनेत सर्वसाधारण नागरिकांना ५.४० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ६.२० टक्के व्याज दिले जाणार आहे. नव्याने; तसेच आधीची मुदत संपणाऱ्या ठेवींचे नूतनीकरण केल्या जाणाऱ्या ठेवींसाठी हे व्याजदर लागू असतील.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या