सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजाराची मोठी घसरण; निफ्टीही खाली आला

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

देशातील भांडवली बाजाराने आज सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवली आहे.

देशातील भांडवली बाजाराने आज सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवली आहे. आठवड्याच्या पहिल्या सत्रात मोठ्या तेजीने सुरवात करणाऱ्या शेअर बाजारातील दोन्ही निर्देशकांनी मंगळवार, बुधवार आणि आज गुरुवारी देखील मोठी घसरण नोंदवली. आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात देशातील सर्वात जुन्या मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर कालच्या सत्रात दोन्ही निर्देशकांनी मोठी घसरण नोंदवली होती. मात्र आज देखील ही घसरण चालूच राहिल्याचे पाहायला मिळाले. आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 379.14 अंकांनी घसरून 51,324.69 आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 89.95 अंकांनी खाली येत 15,118.95 वर बंद झाला. 

भांडवली बाजाराने आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोमवारी ऐतिहासिक पातळी गाठत विक्रम नोंदवला होता. यावेळेस सेन्सेक्सने 52,114.13 आणि निफ्टी 15,314.70 या ऑल टाईम हायवर पोहचला होता. परंतु त्यानंतर सलग तीन सत्रांमध्ये नफेखोरीच्या दबावामुळे शेअर बाजारात घसरण होत असल्याचे पाहायला मिळाले. मागील तीन सत्रांमध्ये मिळून मुंबई शेअर बाजाराचा एनएसई जवळपास 800 अंकांनी घसरला आहे. व तेच निफ्टीमध्ये देखील दिसून आले. निफ्टीचा निर्देशांक जवळपास 190 अंकांनी उतरला आहे.

आज शेअर बाजारातील वितेत्तर, बँकिंग आणि टेकस्टाईल्स मधील कंपन्यांचे शेअर वधारल्याचे पाहायला मिळाले. तर फार्मा, केमिकल्स व आयटी मधील कंपन्यांच्या समभागांनी आज पुन्हा एकदा घसरण नोंदविली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या अर्थसंकल्पातील घोषणेचा परिणाम अजूनही बँकिंगच्या समभागांवर दिसत आहे. आणि त्यामुळेच इंडियन ओव्हरसीज, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंडिया यांचे समभाग आज सुद्धा वधारले.         

 

संबंधित बातम्या