पक्व नारळाचे समर्थन मूल्य केंद्र सरकारकडून घोषित

Pib
बुधवार, 24 जून 2020

कोविड-19 महामारीच्या संकटामुळे नारळाच्या पुरवठा साखळीमध्‍ये खूप व्यत्यय निर्माण झाला होता, त्यामुळे नारळ उत्पादक अडचणीत आले होते. आता या वाढीव समर्थन मूल्यामुळे नारळ उत्पादक शेतकरी बांधवांना लाभ होणार आहे.

मुंबई ,

केंद्र सरकारने पूर्ण पिकलेल्या आणि सोललेल्या नारळाचे 2020 च्या हंगामासाठी किमान समर्थन मूल्य (एमएसपी) प्रति क्विंटल 2700 रूपये घोषित केले आहे. 2019 च्या  हंगामामध्ये पक्व नारळाचे मूल्य 2,571 रूपये प्रति क्विंटल होते. या तुलनेत यंदा सरकारने समर्थन मूल्यामध्ये 5.02 टक्के वाढ केली आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, मोदी सरकारने देशभरामध्ये प्रत्येक स्तरावर सर्व कृषी उत्पादकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पिकलेल्या आणि सोललेल्या नारळाचे समर्थन मूल्य वाढवण्यात आल्यामुळे नवीन नारळाच्या खरेदीमध्ये सुगमता येईल. त्याचबरोबर नारळाच्या लाखो लहान शेतकरी बांधवांना वाढीव समर्थन मूल्याचा लाभ मिळू शकणार आहे.

देशात लहान प्रमाणावर नारळाचे उत्पादन घेवून विक्री करणाऱ्या शेतकरी बांधवांना आपल्या पातळीवर नारळ एकत्र करणे आणि त्याचे खोबरे बनवण्यासाठी व्यवस्था तयार करणे सामान्य गोष्ट नाही. वास्तविक  सुक्या खोबऱ्यासाठी 2020 च्या हंगामासाठी सरकारने 9960 रुपये प्रति क्विंटल असा दर घोषित केला आहे. सोललेल्या आणि पक्व झालेल्या नारळासाठी घोषित केलेला आत्तापर्यंतचा सर्वात जास्त दर आहे. सुके नारळ म्हणजेच खोबरे तयार केले तर नारळ उत्पादकांना रोख पैसा मिळण्याची हमी असते. मात्र ज्यांच्याकडे नारळ पूर्ण सोलून ते वाळवून त्याचे सुके खोबरे तयार करण्यासाठी पुरेशा सुविधा नसतात आणि ज्यांच्याकडे आलेले पिक साठवून ठेवण्याची क्षमता नसते, त्यांना तुलनेने कमी दरामध्ये सोललेले नारळ विकावे लागतात. अशा नारळ उत्पादकांना या वाढीव समर्थन मूल्याचा लाभ होणार आहे. 

संबंधित बातम्या