करप्रणालीतील पद्धतशीर बदलांमुळे डिसेंबरमध्ये 'जीएसटी'चे विक्रमी संकलन

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जानेवारी 2021

कोरोनाच्या संसर्गामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ हळूहळू दूर होऊ लागली असून वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) अंमलबजावणीपासून ते आतापर्यंतची सर्वाधिक विक्रमी वसुली मावळत्या वर्षात झाली आहे.

नवी दिल्ली :   कोरोनाच्या संसर्गामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ हळूहळू दूर होऊ लागली असून वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) अंमलबजावणीपासून ते आतापर्यंतची सर्वाधिक विक्रमी वसुली मावळत्या वर्षात झाली आहे. केंद्र सरकारला डिसेंबरमध्ये तब्बल १ लाख १५ हजार १७४ कोटी रुपये जीएसटी वसुलीतून मिळाले असून ही रक्कम डिसेंबर २०१९च्या तुलनेत बारा टक्क्यांनी अधिक आहे. कोरोना महामारीची झळ बसलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असून जीएसटी करबुडवे आणि बनावट बिलांविरोधात झालेल्या कारवाईमुळे ही विक्रमी वसुली झाल्याचे अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
वस्तू आणि सेवांच्या आंतरराज्यीय पुरवठ्यावर केंद्राकडून आकारल्या जाणाऱ्या ‘सीजीएसटी’पोटी २१३५६ कोटी रुपये तर राज्यांकडून आकारल्या जाणाऱ्या ‘एसजीएसटी’ वसुलीतून मिळालेल्या २७८०४ कोटी रुपयांचा यात समावेश आहे. याखेरीज दोन भिन्न राज्यांमध्ये वस्तू आणि सेवा पुरवठ्यावर आकारल्या जाणाऱ्या ‘आयजीएसटी’तूनही २७०५० कोटी रुपये तर, उपकरापोटी ८५७९ कोटी रुपये सरकारला मिळाले आहेत. तसेच ३- बी जीएसटी रिटर्न फाईल करणाऱ्यांची संख्या नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ८७ लाख झाली आहे. सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी परताव्याचे सर्व दावे निकाली काढल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांना डिसेंबरमध्ये ‘सीजीएसटी’पोटी ४४६४१ कोटी रुपयांची तर ‘एसजीएसटी’पोटी ४५४८५ कोटी रुपयांची मिळकत प्राप्त झाली आहे. 

विक्रमी वसुली

कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाउन शिथिल केल्यानंतर आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येऊ लागल्याने यंदा डिसेंबरमध्ये झालेली जीएसटी वसुली २०१९ च्या डिसेंबरमधील वसुलीच्या तुलनेत बारा टक्क्यांनी अधिक आहे.  एवढेच नव्हे तर जीएसटी कायदा लागू झाल्यानंतरच्या २१ महिन्यातील ही आतापर्यंतची सर्वात विक्रमी वसुली आहे. याआधी एप्रिल २०१९ मध्ये १,१३,८६६ कोटी रुपयांची वसुली झाली होती तर नोव्हेंबर २०२० मधील जीएसटी वसुली १,०४,९६३ कोटी रुपये झाली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये जीएसटी वसुली अनुक्रमे उणे ४२ टक्के आणि उणे ८.२ टक्के होती. 

महाराष्ट्रातून वसुली वाढली

महाराष्ट्रातूनही जीएसटीवसुली सात टक्क्यांनी वाढली आहे.  २०१९ च्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातून १६५३० कोटी रुपये जीएसटीपोटी वसूल झाले होते. ही रक्कम डिसेंबर २०२० मध्ये १७६९९ झाली आहे. भविष्यामध्ये कोरोनाच्या संकटाची तीव्रता कमी झाल्यानंतर हा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या